महाकुंभात एका दिवसात 3.90 कोटी भाविकांचे पवित्र स्नान, आज अमृतस्नानासाठी 10 कोटींचा आकडा पार होण्याचा अंदाज

महाकुंभात आज एका दिवसात तब्बल 3 कोटी 90 लाख भाविकांनी स्नान केले, तर बुधवारी मौनी अमावास्या असल्याच्या पार्श्वभूमीवर अमृतस्नानासाठी तब्बल 10 कोटी भाविक येण्याचा अंदाज उत्तर प्रदेश सरकारने वर्तवला आहे. आज दिवसभरात प्रयागराजमध्ये लोकसंख्येने तब्बल साडेचार कोटींचा आकडा ओलांडला. जिल्ह्याची सुमारे 70 लाख लोकसंख्या जोडून हाच आकडा एका दिवसात 4.60 कोटी इतका विक्रमी झाला. आज प्रयागराजमध्ये भाविकांची इतकी गर्दी उसळली की पोलीस प्रशासनालाही गर्दीवर नियंत्रण मिळवणे अवघड गेले. भाविक अक्षरशः बॅरिकेड्स तोडून मेळाव्यात घुसले.

मौनी अमावास्येनिमित्त होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी रात्रभर अनेक बैठका घेतल्या. गर्दी कशी हाताळावी, सुरक्षेतील आव्हाने कोणती आणि ती कशी सोडवावीत अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. तर आज सकाळी पुन्हा एडीजी झोन भानू भास्कर आणि आयुक्तांनी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची आपत्कालीन बैठक बोलावली. डीएम, सीआरपीएफ, आयटीबीपी, पोलीस, रेल्वे आदी विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. मौनी अमावास्येनिमित्त बुधवारी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वेवर दगडफेक

महाकुंभसाठी झाशीहून प्रयागराजकडे निघालेल्या विशेष ट्रेनवर जमावाकडून दगडफेक आणि हल्ला झाल्याची घटना घडली आहे. काही समाजकंटकांनी ट्रेनवर हल्ला करत खिडक्यांच्या काचा फोडल्याचे आणि दगडफेक केल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. झाशीच्या पुढे हरपालपूर स्थानकावर ही घटना घडली. या घटनेमुळे रेल्वे प्रवासी दहशतीखाली आहेत. चेहऱ्यावर कापड गुंडाळून 8 ते 10 हल्लेखोरांनी हे कृत्य केल्याची माहिती आहे. त्यांचा शोध सुरू आहे.

काही दिवसांसाठी वाहनांना बंदी

पुढील काही दिवसांसाठी कुंभमेळा नो व्हेईकल झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. महाकुंभाच्या ठिकाणी चारचाकी किंवा दुचाकी आणू नये असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे. कुंभमेळय़ावर सर्व बाजूंनी नजर ठेवण्यासाठी एआय सीसीटीव्ही पॅमेरे सज्ज ठेवण्यात आले आहेत. याशिवाय सातत्याने ड्रोनही भिरभिरत आहेत. आगीची दुर्घटना घडू नये याची खबरदारी घेतली जात आहे.

17 दिवसांत 17 कोटी भाविकांचे स्नान

मौनी अमावास्येच्या एक दिवसआधी दुपारी 4 वाजेपर्यंत तब्बल 3 कोटी 90 लाख भाविकांनी संगमावर पवित्र स्नान केले, तर 13 जानेवारी रोजी महाकुंभ सुरू झाल्यापासून आतापर्यंत सुमारे 17.15 कोटी भाविकांनी स्नान केल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारने दिली आहे. दरम्यान, प्रयागराजमधील प्रचंड गर्दी पाहता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा 28 ते 30 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

संगमापासून 15 किलोमीटरपर्यंत जाम

आज मंगळवारी प्रयागराजमध्ये सर्व रस्ते आणि गल्ल्या तुडुंब भरलेल्या होत्या. पार्ंकग किंवा स्टेशनवरून संगमापर्यंत पायीच चालत जावे लागत असून पोलीस अनेक ठिकाणी बॅरिकेड्स लावून भाविकांना रोखत असल्याचे चित्र होते, परंतु भाविकांनी अनेक ठिकाणी अक्षरशः बॅरिकेड्स तोडून महाकुंभात प्रवेश केला. संगमापासून 15 किलोमीटरचा परिसर अक्षरशः जाम झाला होता.