महाकुंभमध्ये आयआयटीयन बाबा अशी ओळख असलेल्या अभय सिंह यांची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. अभय सिंह हे आई-वडील येण्याआधीच महाकुंभ सोडून गेल्याची चर्चा पसरली होती. परंतु, ही केवळ अफवा आहे. ही अफवा आश्रमातील साधूंनी पसरवली होती, असा आरोप अभय सिंह यांनी केला आहे. महाकुंभमधील जुना आखाडय़ाच्या 16 मडी आश्रममधून ते अचानक एका अज्ञात स्थळी निघून गेले होते. परंतु, या सर्व गोष्टींवर अभय सिंह यांनी पुढे येत पडदा टाकला आहे. अभय सिंह यांचा जुना आखाडय़ात प्रवेश कसा झाला? याबाबत माहिती देताना आखाडय़ाचे संत सोमेश्वर पुरी यांनी सांगितले की, अभय सिंह त्यांना वाराणसीमध्ये भटकत असताना सापडले होते. त्यांनीच त्यांना आश्रमात आणले. आता मी प्रसिद्ध झालो तर त्यांनी स्वतःला माझे गुरू बनवून टाकले. परंतु आमच्यात गुरू-शिष्याचे नाते नाही, असे अभय सिंह म्हणाले.
साधूंचा आक्षेप
अभय सिंह प्रसारमाध्यमांना मुलाखती देत सुटले होते. यावेळी त्यांनी नको त्या विषयावरही भाष्य केले, जे त्यांनी करायला नको होते. त्यांना जुना आखाडयाचे आचार्य महामंडलेश्वर अवधेशानंद गिरी यांच्याकडेही घेऊन जाण्यात आले होते. अभय सिंह यांची मानसिक स्थिती पाहता जुना आखाडय़ाने त्यांना आश्रम सोडण्याचे निर्देश दिले. त्यामुळे ते आश्रम सोडून निघून गेले होते.
महाकुंभ सोडून गेल्याची अफवा, अभय सिंह यांचा आरोप
आयआयटीयन बाबाने आज पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आश्रमातील काही साधूंनी माझ्याबद्दल चुकीची बातमी पसरवली आहे. त्यांनी मला रात्रीच तिथून निघून जाण्यास सांगितले. त्यांना वाटते की, मी देशभर प्रसिद्ध झालो आहे. त्यामुळे जर त्यांच्यातल्या काही गोष्टी माहीत झाल्या तर मी त्यांच्या विरोधात जाईल. त्यामुळे त्यांनी मी गुप्त साधनेसाठी महाकुंभातून गेलो असल्याचे परस्पर सांगून टाकले. ते लोक काहीही बरळत सुटले आहेत, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे अभय सिंह म्हणाले.