Mahakumbh 2025 – प्रयागराजच्या महाकुंभमध्ये उघड्यावर शौच, राष्ट्रीय हरित लवादाचा योगी सरकारला दणका

उत्तर प्रदेशात प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभमेळ्यात भाविकांना नाईलाजास्तव उघड्यावर शौचास जावं लागत आहे. त्यामुळे योगी सरकारचा फोलपणा उघड झाला आहे. राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. उघड्यावर शौच प्रकरणी होत असलेल्या आरोपांवर उत्तर देण्यासाठी एनजीटीने योगी सरकारला नोटीस जारी केली आहे. याप्रकरणी एका व्यक्तीने याचिका दाखल केली आहे.

प्रयागराजमध्ये जवळपास 45 कोटी लोक गंगा नदीमध्ये स्नान करण्यासाठी येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. या प्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाला अर्ज देण्यात आला असून त्यामध्ये उघड्यावर शौच करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढल्याचा आरोप करण्यात आला आहे. मानवी मलमुत्र विल्हेवाटासाठी अनेक अत्याधुनिक सुविधांची सोय करण्यात आल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु भाविकांची वाढलेली संख्या, बायो-टॉयलेट्सची कमतरता आणि व्यवस्थित देखभाल नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे भाविकांना नाईलाजास्तव गंगा नदीच्या किनाऱ्यावर उघड्यावर शौचास जावं लागत आहे. त्यामुळे पाणी दुषित झाले असून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.

राष्ट्रीय हरित लवादाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. तसेच या सर्व आरोपांवर उत्तर देण्याच्या सुचना उत्तर प्रदेश सरकारला दिल्या आहेत. 14 फेब्रुवारीला सदर नोटीस जारी करण्यात आल्या असून यामध्ये प्रयागराज कुंभमेळा प्राधिकरण आणि उत्तर प्रदेश प्रदुषण नियंत्रण मंडळाचा सुद्धा समावेश आहे. या प्रकरणी 24 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.