महाकुंभमुळे राम मंदिराकडेही भाविकांची रीघ; भाविकांकडून भरभरून दान

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यामुळे प्रयागराजजवळील इतर धार्मिक स्थळांमध्येही भाविकांची गर्दी होत आहे. यात भाविकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र अयोध्येतील राम मंदिर हे ठरत आहे. गेल्य़ावर्षी रामललांची प्राणप्रतिष्ठापना झालेल्या अयोध्येतील मंदिरात भाविक मोठ्या प्रमाणात येत आहेत. तसेच या काळात भाविकांनी रामललाला भरभरून दान दिले आहे.

प्रयागराज येथील कुंभमेळा अखेरच्या टप्प्यात आहे. पुढील आठवड्यात कुंभमेळ्याची सांगता होणार आहे. त्यानंतर राम मंदिरातील भक्तांची गर्दी ओसरण्याची शक्यता आहे. सध्या भाविकांच्या गर्दीमुळे दानाच्या रकमेची मोजणी करणेही अशक्य असल्याचे मंदिर व्यवस्थापनाने सांगितले. मंदिरात गर्दी असल्याने अनेक दानपेट्यांपर्यंत पोहचता येत नाही. त्यामुळे दानाची मोजणी करता येत नसल्याचे सांगण्यात आले.

राम मंदिर व्यवस्थापनाने आता रामललाच्या दर्शनाची वेळ वाढवल्याने त्याचा भाविकांना फायदा होत आहे. भाविक अनेक तास रांगेत उभे राहून ते रामललांचं दर्शन घेत आहेत. तसेच मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावर दानही देत आहेत. गेल्या 20 दिवसांमध्ये राम मंदिराला एवढ्या मोठ्या प्रमाणावर दान मिळाले आहे की, त्याची मोजणी करणेही कठीण होत आहे. वर्षभरीत राम मंदिराच्या वेगवेगळ्या दान काऊंटरवर 700 कोटी रुपयांहून अधिकचं दान प्राप्त झालं आहे. आताही तसेच मोठ्या प्रमाणात दान जमा झाल्य़ाची शक्यता आहे.