उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभ क्षेत्राला 76वा अस्थायी जिल्हा बनवले आहे. 4 हजार हेक्टर क्षेत्रावर कुंभमेळा भरणार असून त्यासाठी जगभरातून तब्बल 40 कोटींहून अधिक श्रद्धाळू येण्याचा अंदाज आहे.
- 56 ठाणी, फायर स्टेशन आणि तीन महिला ठाणी सज्ज ठेवली आहेत. 37 हजार पोलीस कर्मचारी, 14 हजार होमगार्डसह 50 हजारांहून अधिक सुरक्षा रक्षक तैनात.
- कुंभमेळा 25 सेक्टर्समध्ये विभागला गेला असून घाटांची लांबी 12 किलोमीटर असणार आहे.
प्रयागराज या संगम तटावर उद्यापासून पुढचे 45 दिवस जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा रंगणार आहे. तब्बल 45 दिवस रोज लाखो मंत्र, जप आणि आहुती या कुंभपर्वाच्या निमित्ताने अनुभवता येणार आहेत. पौष पौर्णिमेपासून म्हणजेच 13 जानेवारीपासून सनातन आस्थेचे प्रतीक चारही शंकराचार्य, शैव-वैष्णव आणि सर्व आखाडय़ांचे महामंडलेश्वर, सर्व परंपरांचे जगद्गुरू, सिद्धयोगी आणि संत-महंत महाशिवरात्रीपर्यंत म्हणजेच 26 फेब्रुवारीपर्यंत संगमाच्या किनाऱ्यावर विराजमान असतील.