महाकुंभमेळ्यात मौनी अमावास्येच्या दिवशी संगम नाक्यावर झालेली चेंगराचेंगरी ही एकच नव्हती. तर त्याच दिवशी संगम नाक्यावर घडलेल्या दुर्घटनेच्या ठिकाणापासून अवघ्या 2 किमी अंतरावर आणखी एक चेंगराचेंगरीची घटना घडली. मात्र ही घटना केंद्रातील मोदी व उत्तर प्रदेशातील योगी सरकारकडून जाणीवपूर्वक लपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत 30 भाविकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात त्या ठिकाणी 78 पेक्षा जास्त भाविकांचा मृत्यू झाला असून दीड हजाराहून अधिक भाविक बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
मौनी अमावास्येच्या दिवशी संगम नाका आणि झुशी या दोन्ही ठिकाणी चेंगराचेंगरी झाली. पहिली चेंगराचेंगरी पहाटे 1.30 च्या सुमारास, तर दुसरी चेंगराचेंगरी अंदाजे 5.55 च्या सुमारास घडल्याचा दावा केला जात आहे. कुंभमेळ्यात लाखो भाविकांनी पवित्र स्नान करणे बाकी असताना, अधिकाऱ्यांनी यात्रेकरूंमध्ये भीती निर्माण होऊ नये म्हणून दुसरी चेंगराचेंगरी लपविल्याचे बोलले जात आहे. द लॅलनटॉपचे अभिनव पांडे आणि मोहन कनौजिया, झुशी येथील चेंगराचेंगरीच्या ठिकाणाहून रिपोर्टिंग करताना सोडून दिलेले कपडे, पादत्राणे आणि प्लॅस्टिकच्या बाटल्या ट्रक्टर वापरून साफ करण्यात येत असल्याचे तसेच घटनास्थळावरून आणखी काही मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे म्हटले आहे.
सहा ठिकाणी झाली होती चेंगराचेंगरी – शंकराचार्य
उत्तर प्रदेश सरकारने 18 तास सत्य लपवले असून एक ते दोन नव्हे तर सहा ठिकाणी चेंगराचेंगरी झाली असल्याचा दावा शंकराचार्य स्वामी अविमुत्तेश्वरानंद सरस्वती यांनी केला आहे. चेंगराचेंगरीसारखी घटना लपवणे हृदयद्रावक असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यायला हवा, असेही त्यांनी सांगितले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना शंकराचार्य यांनी भाजप सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणला.
जबाबदारीपासून मोदींचा पळ
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात 1954 मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 64 लोकांचा मृत्यू झाला होता असे सांगत महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या जबाबदारीतून पळ काढण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालविला आहे. नेहरूंच्या कार्यकाळात घडलेल्या या दुर्दैवी घटनेनंतर लोकसभेत सदर घटनेची जबाबदारी स्वीकारली होती, हे सांगणे मोदी जाणीवपूर्व टाळत आहेत.