प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात भाविकांसाठी आयोजित केलेल्या भंडाऱ्याच्या जेवणात एका पोलीस अधिकाऱ्याने वाळू टाकली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यावर लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना आता त्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी सोशल मीडियावरही तक्रार केली होती. या घटनेचा व्हिडीओ समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही शेअर केला होता.
वृत्तानुसार, गंगा नगरचे डीसीपी कुलदीप सिंह गुणवत यांनी सोशल मीडियावरील व्हिडिओ समोर आल्यानंतर सोराव स्टेशनचे हाऊस ऑफिसर ब्रिजेश कुमार तिवारी यांच्यावर कारवाई केली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये पोलीस अधिकाऱ्याने चुलीवर बनवल्या जाणाऱ्या अन्नामध्ये वाळू टाकल्याचे दिसून येते. एका युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या घटनेचा व्हिडिओ शेअर करत तो गंगा नगरच्या डीसीपी यांच्या अकाऊंटला टॅग करत या प्रकरणातील अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर गंगानगरच्या अधिकृत अकाऊंटवरून उत्तर देण्यात आले आहे. त्या व्हिडीओची दखल घेत पोलीस उपायुक्त (गंगा नगर) यांनी ब्रिजेश कुमार तिवारी या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. तसेच विभागीय कारवाई सुरू आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही हा व्हिडिओ सोशलमीडियावर शेअर केला होता.
प्रयागराजच्या सोराव पोलीस स्टेशन परिसरात, पोलीस निरीक्षक ब्रजेश तिवारी यांनी भाविकांसाठी बनवल्या जाणाऱ्या अन्नात वाळू फेकून ते खराब केल्याची घटना घडली.#MahaKumbh2025 #pryagraj pic.twitter.com/JUwmDEoZDj
— Saamana Online (@SaamanaOnline) January 31, 2025
अखिलेश यादव यांनी आपल्या एक्सवर म्हटले होते की, अत्यंत दुर्देवी घटना आहे. एकाबाजूला महाकुंभात अडकलेल्या लोकांना अन्न-पाण्याची व्यवस्था करणाऱ्यांचे प्रयत्न राजकीय द्वेषामुळे हाणून पाडले जात आहेत. लोकांनी याकडे लक्ष द्यायला हवे, असे अखिलेश यादव म्हणाले होते.