
महाकुंभ मेळ्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. प्रयागराजमध्ये किन्नर आखाड्यातील महामंडलेश्वर कल्याण नंद गिरी यांच्यावर गुरुवारी रात्री जीवघेणा हल्ला झाला. सेक्टर-18 मध्ये हल्लेखोरांनी त्यांची गाडी रोखून त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कल्याण नंद गिरी यांना वाचविण्यासाठी मध्ये पडलेले तीन शिष्यही जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून जखमींना तातडीने महाकुंभच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कल्याणी नंद गिरी त्यांच्या गाडीने आखाडा छावणीत परतत असताना वाटेत काही लोक आशीर्वाद घेण्याच्या बहाण्याने गाडीजवळ आले आणि गाडी थांबवल्यानंतर त्यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. त्यांच्या मदतीला आलेल्या शिष्यांवरही हल्ला झाला आणि ते जखमी झाले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महामंडलेश्वर कल्याण नंद गिरी यांना प्रथम मेळ्याच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांची गंभीर प्रकृती पाहून त्यांना एसआरएन रुग्णालयात हलविण्यात आले.सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून हल्ल्यामागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. किन्नर आखाड्यातील संतांवर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाही. पाच दिवसांपूर्वी सनातन किन्नर धाम आणि आखाड्याच्या प्रमुख हिमांगी सखी यांच्यावरही हल्ला झाला होता.