वसंत पंचमीनिमित्त आज संगम तटावर अमृतस्नान होणार आहे. त्यानिमित्ताने प्रयागराजमध्ये एक कोटीहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर राज्य सरकारने मोठा धडा घेतला असून प्रशासनाने दुर्घटना टाळण्यासाठी गर्दीवर ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या माध्यमातून नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून 2 ते 4 फेब्रुवारीपर्यंत प्रयागराज आणि महाकुंभ क्षेत्रात वाहनांना प्रवेश बंदी असेल. तसेच व्हीव्हीआयपी पासही रद्द करण्यात आले आहेत.
मौनी अमावास्येच्या दिवशी अमृतस्नान सुरू होण्यापूर्वी प्रयागराजमध्ये चेंगचेंगरीची घटना घडली होती. या दुर्घटनेत 30 जणांचा मृत्यू तर 60 जण जखमी झाले होते. त्यानंतर निर्धारित वेळेच्या 10 तास उशिराने आखाडय़ांमध्ये अमृतस्नान सुरू करण्यात आले होते. यातून धडा घेऊन राज्य सरकारने संगम तटावर चोख बंदोबस्त तैनात ठेवला आहे. सीसीटीव्ही. ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या माध्यमातून गर्दीवर 24 तास नजर ठेवण्यात येणार आहे.
पंतप्रधान 5 फेब्रुवारीला प्रयागराजमध्ये
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 5 फेब्रुवारीला प्रयागराजमध्ये दाखल होणार आहेत. प्रयागराजमध्ये व्हीव्हीआयपी पास रद्द करण्यात आले आहेत. चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर 5 फेब्रुवारीपर्यंत वाहनांनाही प्रवेशबंदी आहे. असे असताना पंतप्रधान 5 फेब्रुवारी रोजी प्रयागराजमध्ये कसे जात आहेत? तेथे पुन्हा गर्दी उसळली आणि दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असा सवालही उपस्थित होत आहे.
पहाटे चार वाजल्यापासून सुरू होणार संगम यात्रा
मकर संक्रांतीच्या दिवशी महानिर्वाणी आणि अटल आखाडा पहाटे सव्वापाच वाजता अमृत स्नानासाठी निघाला होता. यावेळी आखाडय़ांची संगम यात्रा पहाटे चार वाजता निघणार आहे. पावणेसहापर्यंत अमृतस्नान पूर्ण होतील. वसंत पंचमीच्या दिवशी अमृतस्नान करण्यावर भाविकांची प्रचंड श्रद्धा आहे. त्यामुळे सोमवारी प्रचंड मोठा जनसागर उसळणार आहे. रविवारपासूनच भाविकांचे जथेच्या जथे प्रयागराजमध्ये दाखल होत असल्याचे चित्र आहे.
योगी आदित्यनाथांनी घेतला तयारीचा आढावा
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अमृतस्नानाच्या पार्श्वभूमीवर संगम तट आणि आखाडे तसेच विविध शिबिरांमधील तयारीचा, सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.
आज शेवटचे अमृतस्नान
महाकुंभातील तिसरे आणि शेवटचे अमृतस्नान सोमवारी होत आहे. त्यासाठी सर्वच आखाडय़ांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. रथ आणि पालखी फुलांनी सजवण्यात आली आहे. सर्व महामंडलेश्वर या अमृतस्नानात सहभागी होणार आहेत. वसंत पंचमीच्या दिवशी पहाटे चार वाजता सर्व आखाडय़ांतील महामंडलेश्वर, साधुसंत संगम तटावर जाण्यासाठी निघणार आहेत. निरंजनी आखाडय़ात श्री महंत रवींद्र पुरी, सचिव राम रतन गिरी यांनी मिळून अमृतस्नानाची तयारी पूर्ण केली.
चेंगराचेंगरीनंतर 16 हजार मोबाईल नॉट रिचेबल
महाकुंभमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतर तब्बल 16 हजारांहून अधिक मोबाईल नॉट रिचेबल असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. या सर्व मोबाईल क्रमांकांच्या डेटाचे विश्लेषण केले जात आहे. आतापर्यंतच्या तपासात अनेक मोबाईल क्रमांक बंद असल्याचे आढळून आले. तपासाचा एक भाग म्हणून यूपी एसटीएफ संगम नाक्याभोवती सक्रिय असलेल्या 16 हजार मोबाइल क्रमांकांच्या डेटाची तपासणी करत आहे. महाकुंभमेळा परिसरात बांधलेल्या कमांड आणि पंट्रोल रुमच्या सीसीटीव्हीवरून फेस रेकग्निशन अॅपद्वारे संशयितांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. वसंत पंचमीच्या निमित्ताने होणाऱया अमृतस्नानाबाबत उत्तर प्रदेश पोलीस हाय अलर्टवर आहेत. तिसऱया अमृतस्नानापूर्वी परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. चौथे महास्नान 12 फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमेला होणार आहे, तर शेवटचे स्नान 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीला होणार आहे.
कुंभमेळय़ातील दुर्घटनेचा हॉटेल व्यावसायिकांना फटका
कुंभमेळ्यात मौनी आमावस्येच्या अमृत स्नानादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे हॉटेल बुकिंगमध्ये मोठी घट झाली आहे. अपेक्षित बुकिंग होत नसल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. वसंत पंचमीच्या स्नानानंतर पुन्हा सुगीचे दिवस येतील, अशी आशा त्यांनी त्यांनी व्यक्त केली. दुर्घटनेनंतर अनेक भाविक त्यांनी बुक केलेल्या हॉटेलमध्ये पोहोचू शकले नाहीत. हॉटेल व्यावसायिक म्हणाले की, 28 जानेवारी ते 30 जानेवारीदरम्यान अनेक भाविकांना शहराच्या सीमेवरच थांबवण्यात आले. त्यामुळे त्यांना हॉटेलपर्यंत येता आले नाही. चेंगराचेंगरीची बातमी पसरताच अनेकांनी आपले बुकिंग रद्द केले. या घटनेनंतर हॉटेलमधील 40 ते 50 टक्के खोल्या रिकाम्या राहिल्या. बहुतांश हॉटेलमधील 25 टक्के बुकिंग रद्द करण्यात आली आहेत.