महाकुंभ मेळ्यादरम्यान (Mahakumbh 2025) प्रयागराजला (Prayagraj) जाणाऱ्या विमान भाड्याने जवळपास 50 हजाराच्यावर पर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे गंगा-यमुना-सरस्वती नदीच्या पवित्र संगमात स्नानाचे अनेकांचे स्वप्न अपुरे राहण्याची शक्यता आहे.
महाकुंभ मेळ्याची चर्चा जगभरात सुरू आहे. या 45 दिवसात पवित्र संगमात स्नानाचे अनोखे महत्त्व आहे. शाही स्नानासह या 45 दिवसात संगमात स्नान करण्यासाठी मोठ्याप्रमाणात भाविक येत असतात. ही संख्या जवळपास 40 कोटी पर्यंत जाण्याची शक्यता आहे. प्रयागराज येथे पोहोचण्यासाठी रस्ते, रेल्वे, विमान मार्ग सारेच ओसांडून वाहत आहेत. विमानाचे दर आभाळाला पोहोचले असून जवळपास 50 हजारच्या घरात हे दर पोहोचले आहेत. यात आणखी वाढ होण्याची भिती देखील व्यक्त करण्यात येत आहे.
परिस्थिती पाहता डीजीसीएने विमान कंपन्यांना तिकिटासाठी योग्य दर आकारण्याचा आणि विमान फेऱ्या वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या आदेशानंतरही, तिकिटांच्या किमती वाढलेल्या आहेत. कुंभमेळ्यासाठी 40 कोटी पर्यटक येण्याची अपेक्षा असल्यानं अनेक जण विमान प्रवासाला प्राधान्य देण्याची शक्यता आहे. लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा विमान कंपन्यांकडून घेतला जात असल्याची चिंता भाविक व्यक्त करत आहेत.