
प्रभादेवी रेल्वे स्थानकाजवळचा एल्फिन्स्टन पूल शुक्रवारपासून बंद होत आहे. यामुळे वाहतुकीच्या नियोजनासाठी करी रोडजवळील महादेव पालव मार्गावरील वाहतूक एकतर्फी करण्यात आली आहे. शिवाय या मार्गावर रस्ता दुभाजकावर रेलिंग बसवण्यात आले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होणार असल्याने महादेव पालव मार्गावरील एकतर्फी वाहतुकीला रहिवाशांनी विरोध केला आहे. याबाबत आज शिवसेनेच्या वतीने आंदोलन करून सह्यांची मोहीम राबवण्यात आली.
महादेव पालव मार्गाच्या दुतर्फा रामदूत, त्रिवेणी सदन इ.क. 1 ते 3, सुखकर्ता, विघ्नहर्ता, सिंधुदुर्ग इमारत, धरमशी मॅन्शन अशा मोठय़ा प्रमाणात निवासी इमारती आहेत. सदर इमारतींमध्ये अंदाजे 2500 ते 3000 हजार नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांच्या दैनंदिन कामाकरिता महादेव पालव मार्गावरून कॉम्रेड कृष्णा देसाई चौकाकडे तसेच करी रोड पश्चिमेकडे वारंवार ये-जा करावी लागते. यामुळे महादेव पालव मार्गावरील या एकतर्फी वाहतुकीला रहिवाशांचा विरोध आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली महादेव पालव मार्गावरील एकतर्फी वाहतुकीविरोधात स्वाक्षरी मोहीम आंदोलन करण्यात आले. याबाबत सहपोलीस आयुक्त (वाहतूक) वरळी यांना निवेदनही देण्यात आले.
सदर आंदोलनामध्ये शिवसेना सचिव सुधीर साळवी, उपविभागप्रमुख पराग चव्हाण, शाखाप्रमुख मिनार नाटळकर यांच्यासह शिवसैनिक व स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.