महाड ट्रॉमा सेंटर, ग्रामीण रुग्णालय ‘सलाईन’वर; रुग्णांचे हाल, आरोग्य मंत्र्यांचे आश्वासन हवेतच

महाड ट्रॉमा केअर सेंटर व ग्रामीण रुग्णालयासाठी आरोग्य विभागाने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नऊ पदे मंजूर केली असली तरी प्रत्यक्षात या ठिकाणी केवळ तीनच जण काम करीत आहेत. तब्बल सात पदे रिक्त असल्याने ट्रॉमा केअर सेंटर व ग्रामीण रुग्णालय सलाईनवर आले आहे. पुरेसे कर्मचारी आणि डॉक्टर्स नसल्याने परिसरातील गोरगरीब रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत. त्यांना उपचारासाठी धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे आठ दिवसांत रिक्त पदे भरून डॉक्टरांची नेमणूक करण्याचे आरोग्य मंत्र्यांनी दिलेले आश्वासन हवेतच विरले आहे.

तीन महिन्यांपूर्वी वीर रेल्वे स्टेशनजवळ झालेल्या भीषण अपघातात चौघा जखमींना ट्रॉमा केअर सेंटरमध्ये वेळीच उपचार न मिळाल्याने त्यांना आपले प्राण गमवावे लागले. याविरोधात रुग्णालयातील असुविधेच्या विरोधात महाडवासीयांनी प्रांत कार्यालयावर मूक मोर्चा काढून आरोग्य सेवेचा निषेध केला होता. याची गंभीर दखल घेत आरोग्य मंत्री प्रकाश आंबीटकर यांनी बैठक घेऊन आठ दिवसांत महाड ट्रॉमा सेंटर व ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. मात्र याला तीन महिने उलटून गेले तरी एकाही डॉक्टरची नेमणूक करण्यात आलेली नाही. ट्रॉमा केअर सेंटरमध्ये पाच पदांपैकी केवळ अस्थिरोगतज्ज्ञ नियुक्त आहे, तर इतर चार पदे रिक्त आहेत. तसेच ग्रामीण रुग्णालयातील तीन पदांपैकी एक पद रिक्त आहे.

टँकरने पाणीपुरवठा

मागील आठ दिवसांपासून महाडला पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसी व कोथुर्डे धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे शहरात दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. याचा फटका ग्रामीण रुग्णालयाला बसत आहे. यामुळे नगरपालिकेला रोज किमान दोन टँकरची व्यवस्था करावी लागते. ट्रॉमा केअर सेंटरमध्ये कोणत्याही सुविधा नसल्याने रुग्णांचे हाल होत असून हे सेंटर ‘कोमात’ गेले आहे.