विळे भागाड, दाखणेत मिंधे गटाला भगदाड ; स्नेहल जगताप यांनी नॅपकीनवाल्या शेठला फटकारले

महाड विळे भागाड एमआयडीसीमध्ये सुरू असलेल्या दादागिरी आणि मक्तेदारीमुळे स्थानिकांचा रोजगार धोक्यात आला आहे. मात्र आता ही दादागिरी जास्त काळ चालणार नाही. विधानसभा निवडणुकीनंतर एमआयडीसीतील दादागिरी आणि मक्तेदारी मोडीत निघणार आहे, असे फटकारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीच्या महाड विधानसभा मतदारसंघातील आमदार स्नेहल जगताप यांनी नॅपकीनवाल्या शेठला लगावले. विळे भागाड आणि दाखणे गावातील मिंधे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे जगताप यांचे पारडे जड झाले असून नॅपकीनवाल्या शेठची डोकेदुखी वाढली आहे.

स्नेहल जगताप यांच्या प्रचारासाठी विळे भागाड येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत जगताप यांनी मिंधे गटाचे उमेदवार भरत गोगावले यांच्यावर सडकून टीका केली. विळे भागाड येथील मिंधे गटाच्या आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या भागात मिंधे गटाला भगदाड पडल्यामुळे गोगावले यांना मोठा धक्का बसला आहे. यावेळी स्नेहल जगताप म्हणाल्या की, या भागात आमदारांनी आणि त्यांच्या चेले-चपाट्यांनी दादागिरी करून दहशत माजवली आहे. ही दहशत आता पूर्णपणे मोडीत काढण्यात येणार आहे. या भागातील तरुणांच्या हाताला काम देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे.

मशाल धगधगणार
मिंधे गटाच्या बगलबच्च्यांनी कितीही आदळआपट केली तरी या मतदारसंघात शिवसेनेची मशालच धगधगणार आहे, असा विश्वास यावेळी स्नेहल जगताप यांनी व्यक्त केला. याप्रसंगी बाबुशेठ खानविलकर, अण्णा अधिकारी, जनार्दन मानकर, प्रभाकर मानकर, चंद्रकांत पवार, शिवानी म्हामूणकर, अनिल मोरे, संदीप जाधव, विद्या नलावडे, शिवाजी घाग, महेश कोंडेकर, किरण पागर, बाबू पोळेकर आदी उपस्थित होते. सुधाकर महाडिक, यशवंत महाडिक, दयाराम गोळे, योगेश शिर्के, बळीराम गुलंबे, दत्ता शिर्के, बाळाराम महाडिक, दत्ताराम जाधव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.