महाबळेश्वरच्या लॉडविक पॉइंटवरून उडी मारून आत्महत्या; पर्यटकांसमोरच मारली उडी

महाबळेश्वरातील प्रसिद्ध लॉडविक पॉइंट परिसरातील एलिफंट हेड पॉइंट येथून दरीत उडी मारून बुकिंग एजंट संजय वेलजी रुघानी (वय – 52, सध्या रा. पाचगणी. मूळ रा. शांतीनगर, मीरा रोड, मुंबई) यांनी गुरुवारी दुपारी आत्महत्या केली. अंदाजे चारशे फूट खोल दरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. तब्बल सहा तासांच्या अथक परिश्रमानंतर ट्रेकर्सनी त्यांचा मृतदेह बाहेर काढला.

शहरापासून अंदाजे पाच किमी अंतरावर प्रसिद्ध लॉडविक पॉइंट आहे. गुरुवारी सायंकाळी येथे पर्यटकांची रेलचेल होती. दोन नवदाम्पत्य व एक परदेशी पर्यटक येथे पर्यटनाचा आनंद घेत होते. पर्यटक दाम्पत्य या पॉइंटवर बसून व्हिडीओ चित्रीकरण करत असतानाच, संजय रुघानी यांनी थेट दरीमध्ये उडी मारली.

पर्यटकांनी याबाबत स्थानिक स्टॉलधारकांना माहिती दिली. स्टॉलधारकांनी माहिती देताच, महाबळेश्वर पोलिसांसह वन विभाग व महाबळेश्वर व सह्याद्री ट्रेकर्स टीम घटनास्थळी दाखल झाली. दोन्ही ट्रेकर्स जवान चारशे फूट खोल दरीमध्ये रोपच्या मदतीने उतरले. सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर रुघानी यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. महाबळेश्वर व पाचगणी परिसरात संजय रुघानी हे बुकिंग एजंट म्हणून व्यवसाय करत होते. पर्यटनस्थळी त्यांचे दोन्ही मोबाईल सापडले आहेत.

अमित कोळी, सोमनाथ वागदरे, संजय पार्टेसर, सौरभ गोळे, जयवंत बिरामणे, अमित झाडे, सौरव साळेकर, सुजित कोळी, आतेश धनावडे, अनिल लांगी, सूर्यकांत शिंदे, सुजित कोळी, मंगेश सालेकर, दीपक ओंबळे, अक्षय नाविलकर, सचिन डोईफोडे, अनिकेत वागदरे, आशीष बिरामणे, मिथून चव्हाण, किरण चव्हाण, विक्रम शेलार या ट्रेकर्सच्या जवानांसह वन विभागचे वनरक्षक लहू राऊत, गणेश वागदरे, संतोष बावळेकर, नीलेश सपकाळ यांनी मृतदेह बाहेर काढला. पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली रौफ इनामदार तपास करत आहेत.