पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात पथारीच पसरली आहे. कारण महाराष्ट्र त्यांना भीक घालत नाही. त्यामुळे निवडणुका लागल्यापासून सांगतोय की महाराष्ट्रात भाजपचा पराभव होत आहे. महाराष्ट्रात आमचे सरकार येताच पुढच्या 6 महिन्यात दिल्लीतील मोदींचे सरकार डळमळीत होईल. त्यामुळे देशाचे लक्ष महाराष्ट्राच्या निकालावर लागले आहे. म्हणूनच मोदी, शहा, गुजरातचे मंत्रीमंडळ संपूर्ण राज्यात फिरत आहे. मात्र आम्हाला खात्री आहे की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार येईल, असा ठाम विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज मुंबईतील शिवतीर्थावर सभा आहे. या सभेची जाहिरात देताना भाजपने मोदींना आधुनिक हिंदुस्थानचे शिल्पकार म्हटले आहे. याचा समाचार घेताना राऊत म्हणाले की, भाजप हा जाहिरातीवर तरलेला पक्ष असून जाहिरातबाजीवर खर्च करूनच मोदी 2014 साली सत्तेवर आले. आता 10 वर्षानंतर मोदींनी देशात फार मोठी क्रांती केली किंवा नवीन आधुनिक हिंदुस्थान घडवला असे काही दिसत नाही. किंबहुना त्यांनी हा देश अनेक वर्ष मागे नेला.
मोदी शिवतीर्थावर सभा घेत असून त्यांनीच बसवलेल्या गुलामांचे सरकार महाराष्ट्रात आहे. पण शिवतीर्थाला एक इतिहास असून तिथेच हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची समाधी आहे. त्यांना स्मरून मोदींनी छातीवर हात ठेऊन सांगावे की महाराष्ट्र तोडण्यासाठी, मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी त्यांना शिवसेना तोडली की नाही, असे आव्हान राऊत यांनी दिले.
महाराष्ट्र जिंकला की दिल्लीचे तख्तही डगमगेल! उद्धव ठाकरे कडाडले
मोदी येतील आणि जातील. प्रचार संपल्यानंतर ते ताबडतोब ब्राझीलला चालले आहेत. तिथून ते आणखी दोन देशात जातील. आधुनिक हिंदुस्थानचा हा शिल्पकार देशात असतो का? ग्रापंचायतीपासून लोकसभेपर्यंत हा आधुनिक शिल्पकार प्रचारात असतो. कोणतीही निवडणूक असली की भाजप त्यांना प्रचारात उतरवते. प्रचार नसेल तर मग ते जागतिक दौऱ्यावर असतात आणि जगात फिरत असतात, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
View this post on Instagram
बंडखोरीवर राऊत आक्रमक
महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी आमच्या सहकाऱ्यांनी त्यांचे उमेदवार उभे केले आणि ते मागे घेतलेले नाहीत. आता त्याचा काय परिणाम होतो ते आम्हाला पहावे लागेल. आम्ही आमच्या पक्षातील अनेकांची हकालपट्टी केलेली आहे. आम्ही मविआचा धर्म पाळतो. काँग्रेसनेही 20 पेक्षा जास्त बंडखोरांवर कारवाई केल्याचे दिसते. पण श्रीगोंदा, पाचोरा अन्य काही ठिकाणी राष्ट्रावादीचे जे उमेदवार उभे आहेत त्यांच्यावर पक्षाने कारवाई केलेली नाही. आम्ही या संदर्भात शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळेंशी चर्चा केलेली आहे. बंडखोरांवर राष्ट्रवादीनेही कारवाई करावी अशी भूमिका आहे, असे राऊत म्हणाले.