लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीआधीही वेगवेगळे सर्व्हे येत आहेत. मात्र या सर्व्हेंवर विश्वास ठेवावा अशी परिस्थिती नाही. महाविकास आघाडीला 10 जागाही मिळणार नाही असे सर्व्हे लोकसभेला आले होते, पण आम्ही 31 जागा जिंकल्या. मोदी 400 पार जातील असाही सर्व्हे आलेला, पण त्यांना बहुमतही मिळाले नाही. आताही सर्व्हेंद्वारे भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र चंद्रचूड किंवा मोदी-शहांच्या कृपेनं सत्तेत बसलेलं सरकार पुन्हा निवडून येणार नाही, असा ठाम विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राची जनता जागरूक, सावध आहे. महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा मिळतील. चोऱ्यामाऱ्या करून भाजप किंवा शिंदे गटाचे लोक ज्या जागा जिंकण्याचा प्रयत्न करतात तिथे आमच्या कार्यकर्त्यांना अत्यंत सावध रहायला सांगितले आहे. शेवटच्या क्षणी मोठ्या प्रमाणात पैशाचे वाटप होते. ईव्हीएमच्या बॅटऱ्यांचा विषय हरयाणा निवडणुकीवेळी आला होता. यासह अनेक विषय असून त्या संदर्भात आम्ही जास्त सावध व जागरूक आहोत. कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये चंद्रचूड किंवा मोदी-शहांच्या कृपेने सत्तेत बसलेले सरकार पुन्हा निवडून येणार नाही याची खात्री आहे, असेही राऊत यावेळी म्हणाले.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना वृत्तपत्रांमध्ये एक जाहिरात झळकली आहे. ‘एक है तो सेफ है’ अशी ही जाहिरात असून यात वेगवेगळ्या टोप, पगडी यांचे फोटो देण्यात आलेले आहे. मात्र यात मुस्लिम टोपी नाही. यावर विचारले असता राऊत म्हणाले की, हीच मुस्लिम टोपी मोदी इस्लामी राष्ट्रांमध्ये जातात तेव्हा घालतात. सौदीला, गल्फला, दुबईला किंवा शारजाला गेले… की मोदी त्यांची टोपी जरूर घालतात.
भारतीय जनता पक्षाकडे सध्या कोणताही विषय राहिलेला नाही. विकासाचा, रोजगाराचा किंवा शेतकऱ्यांचा विषय त्यांच्याकडे नाही. त्यांच्याकडे फक्त धर्म आणि टोप्या आहेत. गेल्या 10-12 वर्षात याशिवाय दुसरा कोणता विषय त्यांच्यासमोर नाही. पण महाराष्ट्रामध्ये निवडणुका जिंकण्यासाठी या टोप्या आणत असतील तर अशा टोप्या चालणार नाहीत, असेही राऊत यांनी ठणकावले.
View this post on Instagram
सर्व जबाबदारी प्रशासनाची
शिवसेनेला 17 नोव्हेंबर आणि दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर सभेसाठी परवानगीची गरज लागू नये. 17 नोव्हेंबर हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन आहे. त्यादिवशी शिवतीर्थावर राज्यभरातून बाळासाहेबांचे लाखो भक्त येतात, हे प्रशासनाला माहीत असते. त्याच्यामुळे इतर कुणाला परवानगी देण्याआधी तारीख काय आहे, हे त्यांनी समजून घ्यायला हवे. हा शहाणपणाचा निर्णय असतो, जर तो त्यांनी घेतला नसेल किंवा राजकीय दबावाखाली काही निर्णय घेत असतील तर 17 नोव्हेंबरच्या दिवशी कोणताही संघर्ष शिवतीर्थावर होणार याची काळजी आणि जबाबदारी प्रशासनावर असेल, असा इशाराही राऊत यांनी दिला.
वार्तापत्र (पालघर) – निष्क्रिय गावितांचा मतदार करणार करेक्ट कार्यक्रम; निष्ठावंत दुबळांना पसंती