विधानसभा निवडणुकीत महायुतीने रडीचा डाव खेळला. इस्त्रायल येथील टेक्नॉलॉजीच्या साह्याने ईव्हीएम मशिन्स हॅक करून मतांमध्ये फेराफेर केल्याचा आरोप हडपसर विधानसभा मतदासंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी केला. इस्रायलमधील काही ओळखींकडून ईव्हीएम मशिन्स हॅकिंगबाबत माहिती मिळाली आहे. त्यामुळे यापुढे महाविकास आघाडीने व्ही. व्ही. पॅट मतदान मोजणी अर्ज करणे, निकालाबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणे आणि या निकालाच्या विरोधामध्ये न्यायालयात याचिका दाखल करणे, अशी रणनिती ठरविल्याचेही त्यांनी नमूद केले.
पुणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांची बैठक पुण्यातील राष्ट्रवादी भवन येथे पार पडली. या बैठकीत ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे, ईव्हीएम मशिन तज्ज्ञ माधव देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. बैठकीत विधानसभा निवडणूक निकालावर चर्चा करून पुढील रणनिती ठरविली. यानंतर आयोजित पत्रकार परिषेद प्रशांत जगताप बोलत होते. याप्रसंगी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख संजय मोरे, माजी मंत्री रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रभारी शहराध्यक्ष अंकुश काकडे, काँग्रेसचे अॅड. अभय छाजेड उपस्थित होते.
पडद्यामागून शक्तींनी यंत्रणा वापरून मतदान यंत्रात बदल घडविला आणि त्यातून झालेला हा पराभव आहे. सुरुवातीला मॉक पोल करून झीरो मतदान दाखविले जाते. त्या मशिनला मतदानाच्या दिवशीचा चिन्ह अपलोड करताना सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंतचा प्रोग्रॅम दिला जातो. यामुळे मतदानाच्या दिवशी प्रोग्रॅम काम करतो. हा प्रोग्रॅम निवडणुकीच्या आधी आणि नंतर काम करत नाही.
यानंतर विरोधकांनी आक्षेप घेतल्यास मतदान यंत्रात मतदानाच्या दिवशी फेरफार झालाच नाही हे सांगण्यासाठी निवडणूक आयोग मोकळा आहे. यानुसार यंदा मतदान यंत्रे हॅक करून यंत्रात 15 ते 25 टक्के मतदान सेट केले होते. दरम्यान, यापुढील काळात आता व्हीव्हीपॅटची मोजणी, आयोगाकडे तक्रार करणे आणि या निकालाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे.
उमेदवारांची उपस्थिती
पराभूत उमेदवारांच्या बैठकीला हडपसर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप, कॅन्टोन्मेंटचे रमेश बागवे, शिरूर हवेलीचे अशोक पवार, छत्रपती शिवाजीनगर दत्ता बहिरट, दौंडचे रमेश थोरात उपस्थित होते. तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, अजित गव्हाणे, संग्राम थोपटे, संजय जगताप, अश्विनी कदम यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.