विधानसभा निवडणुकीत खोके सरकारला धूळ चारण्यासाठी सर्वसामान्य जनता सज्ज असून दिल्लीला मुजरा करणाऱ्या गद्दारांना ठाणेकर निश्चित धूळ चारतील, असा जबरदस्त विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला. गुरुवारपासून प्रचाराचे फटाके वाजण्यास सुरुवात होणार असून त्यात 50 खोकेवाले जळून खाक होतील, असा इशाराही आघाडीच्या नेत्यांनी दिला.
ठाणे शहर, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा आणि कळवा-मुंब्रा या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले असून महाविकास आघाडीचे उमेदवार दणदणीत मतांनी विजयी होतील आणि राज्यात आघाडीचीच सत्ता येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
ठाण्यातील आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एकदिलाने काम करून प्रचाराचा धडाका लावतील, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राजन विचारे यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला ठाणे जिल्हाप्रमुख व कोपरी- पाचपाखाडी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार केदार दिघे, काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सुहास देसाई यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.