अर्थसंकल्प कोणासाठी, सत्ताधाऱ्यांच्या टक्केवारीसाठी! विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची निदर्शने

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळ परिसरात विरोधी पक्ष आक्रमक झाले. विरोधी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन करत ‘अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या वाट्याला येतील अक्षता, महायुती सरकारने घेतली दक्षता’ अशा जोरदार घोषणा देत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. मुंबई येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी गाजर दाखवत विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली.

महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात सहाव्या क्रमांकावर गेला आहे. गुजरात महाराष्ट्राच्या पुढे असून कृषी व संलग्न क्षेत्राचा विकासदर 2.50 टक्क्यांपेक्षा जास्त, तर सेवा क्षेत्रातील विकासदर 4.2 टक्क्यांनी घटला आहे. हे अधोगती ‘महायुती’ सरकार असल्याचा हल्लाबोल विरोधी पक्षाने केला.

यावेळी ‘अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या वाट्याला येतील अक्षता, महायुती सरकारने घेतली दक्षता’, ‘अब की बार महाराष्ट्रातील उद्योगधंदे सीमापार’, ‘अर्थसंकल्प कोणासाठी, सत्ताधाऱ्यांच्या टक्केवारीसाठी’, ‘घटनाबाह्य सरकारचा अजब कारनामा, शेजारी तुपाशी महाराष्ट्र उपाशी’, ‘शेतकरी झाला कर्जबाजारी, सरकार वसुलीत बेजारी’, असे फलक हातात घेत महाराष्ट्राला गुजरातच्या मागे टाकणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, महाराष्ट्राला दिवाळखोरीत नेणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्याला कर्जमाफी झालीच पाहिजे, अशी गगनभेदी घोषणाबाजी करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळ परिसर दणाणून सोडला.

राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात शेती उत्पन्नात मोठी घट झाली आहे. या सरकारचे कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष होत आहे. आज गुजरात महाराष्ट्राच्या पुढे गेला हेच महायुती सरकारचे अपयश असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.