‘महायुती सरकारचं एकच मिशन, प्रत्येक कंत्राटात 30 टक्के कमिशन’, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष आक्रमक

महायुती सरकारच्या काळात भ्रष्टाचार वाढला आहे. सत्ताधारी आमदार ते मंत्री सर्वांची दलालांसोबतच मैत्री लपून राहिलेली नाही. स्वतःचे खिसे भरण्याकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष असून सर्वसामान्यांच्या समस्यांचे त्यांना काहीही देणेघेणे नाही. याचा निषेध म्हणून पावसाळी अधिवेशनाच्या बाराव्या दिवशी विधिमंडळ परिसरात विरोधी पक्ष आक्रमक झाला. विरोधी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन करत ‘भाजप हटवा, भ्रष्टाचार मिटवा’, ‘महायुती सरकारचे एकच मिशन, प्रत्येक कंत्राटात 30 टक्के कमिशन’, म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.

मुंबई येथे महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधान भवनाच्या पायऱ्यांवर राज्यात वाढलेल्या भ्रष्टाचार विरोधात जोरदार निदर्शने केले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अजय चौधरी, राजन साळवी, काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना आणले रस्त्यावर भ्रष्टाचारी सत्तेच्य गादीवर, महायुती सरकारचे एकच मिशन प्रत्येक कंत्राटात 30 टक्के कमिशन, भ्रष्टाचारी झाले सत्ताधारी,कष्टकरी झाले भिकारी,योजनेत सरकार घेते टक्केवारी वर सांगतात आम्ही नाही भ्रष्टाचारी, भाजप हटवा भ्रष्टाचार मिटवा , सत्ताधारी आमदार ते मंत्री सर्वांना हवी दलालांची मैत्री, अशा विविध घोषणा लिहिलेले फलक हाती घेत महायुती सरकारच्या काळात राज्यात वाढलेल्या भ्रष्टाचार विरोधात निदर्शन केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

कमिशन एजंट सरकार हाय हाय, टक्केवारी सरकार हाय हाय, खोके सरकार हाय हाय, शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार असो, अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडी नेत्यांनी आक्रमक होत पायऱ्यांवर आंदोलन केले.