महाकुंभला जाणाऱ्यांसाठी खुशखबर! रल्वे तर्फे तीन दिवस विशेष गाड्यांचे नियोजन

उत्तर प्रदेशात महाकुंभ मेळा सुरू असून आतापर्यंत कोट्यवधी भाविकांनी गंगास्नान केलं आहे. 15 जानेवारीला महाकुभांची सुरूवात झाली असून 26 फेब्रुवारीला शेवट होणार आहे. त्यामुळे अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. याच पार्श्वभूमीवर रोज लाखोंच्या सख्येने भाविक महाकुंभात सहभागी होण्यासाठी जात आहेत. प्रवाशांची ही गर्दी लक्षात घेता भारतीय रेल्वेने विशेष गाड्यांची व्यवस्था केली आहे.
उत्तर रेल्वेने या संदर्भात एक निवेदन जारी केले आहे. या अंतर्गत वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची आजपासून 3 दिवस विशेष सेवा सुरू करण्यात आली आहे. महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी उत्तर रेल्वेने 15, 16 आणि 17 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान प्रयागराज मार्गे विशेष वंदे भारत ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे.
उत्तर रेल्वेने दिलेल्या निवेदनात वंदे भारत विशेष ट्रेन क्रमांक 02252 ही नवी दिल्लीहून सकाळी साडे पाच वाजता रवाना होईल आणि दुपारी बारा वाजता  प्रयागराज मार्गे वाराणसीला अडीच वाजता पोहोचेल.  ही ट्रेन नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून सुटेल. वंदे भारत ट्रेनचे हे वेळापत्रक आजपासून 3 दिवसांसाठी असणार आहे.
दरम्यान, परतीच्या प्रवासात 02251 क्रमांकाची ट्रेन वाराणसीहून दुपारी सव्वा तीन वाजता रवाना होईल आणि सायंकाळी साडे पाच वाजता प्रयागराजला पोहचून रात्री 12  वाजता नवी दिल्लीला पोहोचेल. शनिवार आणि रविवारी महाकुंभमेळ्यात मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन रेल्वेने हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (सीपीआरओ) हिमांशू शेखर उपाध्याय यांनी दिली.