उत्तर प्रदेशातील महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी होऊन अनेक भाविक जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमी लोकांच्या संख्येची अद्याप पुष्टी झालेली नाही. मात्र या घटनेत किमान 30 ते 40 भाविक जखमी झाल्याची माहिती तेथील प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 10 जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. त्यामुळे आखाडा परिषदेनं मौनी अमावस्येनिमित्त होणारं 13 आखाड्यांचं अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आनंद आखाड्यात सकाळी 10 वाजता श्रद्धांजली सभा घेण्यात येणार आहे.
नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन केले आहे. त्यामुळे देश विदेशातून लाखोंच्या संख्येने भाविक या मेळ्यात सहभागी झालेत. अश्यातच बुधवारी रात्री मौनी अमावस्येनिमित्त अनेक भाविक अमृतस्नान करण्यासाठी आले होते. पहाटे 5 वाजता अमृतस्नान होणार होतं. यासाठी भाविकांनी रात्रीपासूनच गर्दी केली होती. याचदरम्यान रात्री 1 वाजताच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली. यावेळी लाखो भाविक संगमाच्या तटावर स्नान करत होते.
लाखोंच्या संख्येने आलेल्या भाविकांना संगम घाटावर स्नान करायचे होते. दुसऱ्या घाटावर स्नान करायला तयार नव्हते. त्यामुळे संगम घाटावर प्रचंड गर्दी झाली होती. यामुळे पोलीस भाविकांना घाटावरून बाजूला करत होते. यावेळी पोलिसांनी लावलेल्या बॅरिगेटचा काही भाग कोसळला आणि लोकांनी पळापळ सुरू केली. यावेळी अनेक भाविकांचे सामान पडल्यामुळे गोंधळ उडाला. तेथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. या घटनेत 30 ते 40 भाविक जखमी झाल्याची माहिती इंडिया टुडेच्या वृत्तात दिली आहे. मात्र, प्रशासनानं आकडेवारी जाहीर केलेली नाही.
दरम्यान या घटनेत जखमींना स्वरुप राणी नेहरु रुग्णालयात पाठवण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे आखाडा परिषदेनं मौनी अमावस्येनिमित्त होणारं 13 आखाड्यांचं अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी दिली आहे. येत्या वसंत पंचमीला किंवा महाशिवरात्रीला हे स्नान होणार आहे.
एका तासात पंतप्रधान मोदींचा योगी आदित्यनाथ यांना दोनदा फोन, कुंभमेळ्यातील परिस्थितीची घेतली माहिती