कुंभमेळ्यात दोन हजारांपेक्षा अधिक माणसे मृत्यमुखी, संजय राऊत यांचा सनसनाटी दावा

महाकुंभ हा आमच्या श्रद्धेचा व आस्थेचा विषय आहे. महाकुंभ व्यवस्थित व्हावा अशी अपेक्षा होती. डिजिटल महाकुंभच्या घोषणा झाल्या. वीस-पंचवीस कोटी लोक येतील, अशी हवा दिली गेली. कुंभ हा राजकीय इव्हेंट केला गेला. त्याचे मार्केटिंग झाले. महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी झाली. मात्र, सरकारने चेंगराचेंगरी अफवा ठरवली. महाकुंभात तीस लोक मृत्युमुखी पडले, असे सांगितले गेले. हा आकडा खरा आहे का, असा सवाल शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला. महाकुंभात किमान दोन हजारांहून अधिक माणसे मृत्युमुखी पडली आहेत. मात्र, सरकार दिशाभूल करत असल्याचा दावा संजय राऊत यांनी राज्यसभेत केला.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना खासदार संजय राऊत यांनी मोदी व योगी सरकारच्या ढोंगीपणाची सालपटेच काढली. त्यामुळे खवळलेल्या सत्तापक्षाच्या खासदारांनी राऊत यांच्या भाषणात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. महाकुंभासारख्या पवित्र पर्वामध्ये केवळ राजकीय इव्हेंट करण्याच्या अट्टाहासापोटी चेंगराचेंगरी झाली. त्यात तीस जण मृत्युमुखी पडल्याचा आकडा सरकार सांगत आहे. हा आकडा खरा आहे काय, असा खडा सवाल त्यांनी राज्यसभेत उपस्थित केला. या कुंभामध्ये किमान दोन हजार लोक दुर्दैवाने मृत्युमुखी पडले आहेत आणि तितकेच लोक बेपत्ता आहेत, असा खळबळजनक खुलासा खासदार संजय राऊत यांनी करताच सभागृह स्तब्ध झाले. राज्यसभा उपसभापती हरिवंशसिंग यांनी यासंदर्भात काही पुरावे असतील तरच तुम्ही बोला, असे राऊत यांना सांगितले. मात्र, राऊत यांची तोफ धडाडतच होती. त्यामुळे सत्ताधारी पक्षांत अस्वस्थता वाढत होती. ती लक्षात येताच, उपसभापतींनी, संजय राऊत तुमची बोलण्याची वेळ संपली, असे सांगत त्यांचा माईकच बंद केला.

या महाकुंभात किमान  दोन हजार माणसे मृत्युमुखी पडली आहेत. सरकार दिशाभूल करत आहे, असा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संसदीय पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत मोदी व योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राऊत यांचा हल्लाबोल चांगलाच जिव्हारी लागल्यामुळे उपसभापती हरिवंशसिंग यांनी, राऊत तुम्ही ठोस पुरावे द्या पुष्टी करा, तुमची वेळ संपली आहे, असे सांगत त्यांचा माईक बंद केला.

भाजपाईंमध्ये भगदड माजली, पण कशासाठी

महाकुंभमधील मृत्यूंच्या आकडेवारीवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यसभेत मोदी व योगी सरकारवर केलेला हल्ला जिव्हारी लागल्यामुळे उपसभापती हरिवंशसिंग यांनी, तुम्ही ठोस पुरावे द्या पुष्टी करा. तुमची वेळ संपली असे सांगत त्यांचा माईक बंद केला. संजय राऊत यांनी यासंदर्भात एक्स पोस्ट करत प्रश्न उपस्थित केला आहे. मी काय चुकीचे सांगितले? पण माझा माईक बंद केला, कुंभमध्ये 30 नाही जास्त लोक मृत्युमुखी पडले आहेत. बस्स एवढेच सांगितले आणि सभागृहात भाजपाईंमध्ये भगदड माजली, पण कशासाठी? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

एव्हाना पंतप्रधानांचा राजीनामा झाला असता

सत्ताधारी पक्षाचे लक्ष प्रशासकीय कामांत नसल्यामुळे महाकुंभमध्ये दुर्दैवी घटना होत आहेत. कुंभ सुरू होण्यापूर्वी तिथल्या सरकारने मोठमोठय़ा घोषणा केल्या होत्या. यंदाचा कुंभ डिजिटल कुंभ होईल, अशा बाता मारल्या गेल्या. वीस कोटी, पंचवीस कोटी लोक कुंभाच्या स्नानासाठी येतील, असे सांगितले गेले. प्रत्यक्षात तिथे काय व्यवस्था होती, किती दुरवस्था होती. कुंभमेळ्यात घडली तशी दुर्दैवी घटना इतर देशात घडली असती तर एव्हाना तिथल्या पंतप्रधानांचा राजीनामा झाला असता, असा टोलाही संजय राऊत यांनी यावेळी लगावला.

सरकारचे चोवीस तास राजकारण सुरू

देशाची लोकशाही सध्या आयसीयूमध्ये आहे. निवडणूक लढविणे आणि त्या येनकेनप्रकारेन जिंकणे हाच सत्ताधारी पक्षाचा एकमेव कार्यक्रम सध्या देशात सुरू आहे. चोवीस तास राजकारण सुरू आहे. सरकारने वास्तविक प्रशासन चालवायचे असते. विकासात्मक काम करायचे आहे. मात्र, सध्याचे राज्यकर्ते निवडणुकांमध्ये इतके गुरफटून गेले आहेत की त्यांना बाकी कशाचे भान नाही, असा घणाघात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला.