![Mamata Banerjee](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/08/Mamata-Banerjee-696x447.jpg)
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीतील मृत्यू आणि गर्दीचं गैरव्यवस्थापन यावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. तसेच या अव्यस्थापनामुळे महाकुंभ आता ‘मृत्यू कुंभ’ बनला आहे असा हल्लाबोल केला. व्हीआयपींना विशेष सुविधा दिल्या जात असताना, गरिबांना आवश्यक सुविधांपासून वंचित ठेवलं जात असल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला.
त्यांनी भाजप सरकारवर टीका केली, ते ‘राष्ट्राचे विभाजन करण्यासाठी धर्माचा वापर करत आहेत’ असा आरोप त्यांनी केला. प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभत नियोजनाचा अभाव दिसत आहे, असं त्या म्हणाला.
‘हा ‘मृत्यू कुंभ’ आहे. मी महाकुंभाचा आदर करते आणि मी पवित्र गंगा मातेचा आदर करते. पण प्रयागराजमध्ये कोणतंही नियोजन नाही. किती लोकांना वाचवले गेले आहे? श्रीमंत आणि व्हीआयपींसाठी, १ लाख रुपयांपर्यंत छावण्या (तंबू) मिळवण्यासाठी व्यवस्था आहे. पण गरिबांसाठी, कुंभमेळ्यात कोणतीही व्यवस्था नाही’, असं पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला संबोधित करताना त्या म्हणाल्या.
कुंभमेळ्या सारख्या आयोजनांसाठी योग्य व्यवस्थेची गरज असते असं म्हणतानाच त्यांनी प्रश्न केला की, ‘इतक्या मोठ्या मेळ्यासाठी योग्य नियोजन असायला हवं होतं. घटनेनंतर कुंभमेळ्याला किती आयोग पाठवले गेले आहेत?’
बॅनर्जी यांनी पुढे आरोप केला की मृतदेह शवविच्छेदन न करता बंगालला पाठवण्यात आले. ‘तुम्ही मृत्यू प्रमाणपत्रांशिवाय मृतदेह पाठवल्यामुळे आम्ही इथे शवविच्छेदन केले. या लोकांना भरपाई कशी मिळेल?’, असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.