जीन्स घालून ‘फिडे’च्या ड्रेसकोड नियमांचे उल्लंघन केले म्हणून जगज्जेत्या नार्वेच्या मॅग्नस कार्लसनची जागतिक जलदगती आणि ब्लिट्स बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतून हकालपट्टी करण्यात आली. मात्र, कार्लसनने जीन्स बदलण्यास नकार देत आता यापुढे ‘फिडे’च्या कुठल्याच स्पर्धेत खेळणार नाही, अशी घोषणा केली होती. कार्लसनच्या या अट्टहासापुढे अखेर नमते घेत ‘फिडे’ने जीन्स घालून खेळण्यास परवानगी दिल्याने हा पाच वेळचा जगज्जेता खेळाडू पुन्हा स्पर्धेत परतला आहे.
बुद्धिबळ जगतातील अव्वल खेळाडू असलेल्या मॅग्नस कार्लसनला ‘फिडे’ने जीन्स घालून खेळण्यास मज्जाव केला होता. जीन्स घातली म्हणून कार्लसनला 200 अमेरिकन डॉलर्सची दंडात्मक कारवाई करून जीन्स बदलण्याची सूचना करण्यात आली. मात्र, त्याने जीन्स बदलण्यास नकार दिला. त्यामुळे त्याची स्पर्धेतून हकालपट्टी करण्याचा तडकाफडकी निर्णय घेण्यात आला. आंतरराष्ट्रीय चेस फेडरेशनन (फिडे) ट्विट करून कार्लसनवरील या कारवाईबद्दल माहिती दिली होती. माझ्यावर ज्या कारणामुळे कारवाई झाली ते कारणच मूर्खपणाचे आहे, असा पवित्रा मॅग्नस कार्लसनने घेतला होता.