Maghi Ganeshotsav – आंजर्ले कड्यावरील श्रीगणपती देवस्थानचा माघी गणेशोत्सव मोठ्या भक्तीभावाने उत्साहात साजरा

फटाक्यांची आतषबाजी आणि सनई चौघड्यांच्या मंजुळ सुस्वरात आंजर्ले कड्यावरील श्री गणपती देवस्थानचा माघी गणेशोत्सव मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्रींची मुर्ती पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आंजर्ले कड्यावरील गणपती हा सुप्रसिद्ध असून हे जिल्ह्यातील महत्त्वाच्या देवस्थानांपैकी एक आहे. मंदिरात गेली अनेक शतके माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. यावर्षी सुद्धा माघी गणेशोत्सव मोठ्या भक्तीभावाने उत्साहात साजरा करण्यात आला. हा सोहळा गुरुवार (30 जानावीर 2025) पासून मोठ्या धुमधडाक्यात धार्मिक संस्कृतीचा बाज राखत पंचमृती व सहस्त्रावर्तने, गणेश याग, संकल्प, पुण्याहवाचन, देवता स्थापना व गणपती अथर्वशीर्ष सहस्त्रावर्तने, अग्नी स्थापना, ग्रह यज्ञ, आरती, हळदी कुंकू , संगीत भजनांच्या सादरीकरणाने सुरू झाला. दूसऱ्या दिवशी शुक्रवारी 31 जानेवारीला श्री गणेश याग, हवन, बलिदान, पूर्णाहुती, अभिषेक, यज्ञ समाप्ती, आरती, मंत्रपुष्पांजली आदी धार्मिक कार्यक्रमाबरोबरच स्पर्धा व बक्षीस वितरण समारंभ तसेच मनोरंजनासाठी संगीत भजनांचे कार्यक्रम पार पडले. उत्सवाच्या मुख्य दिवशी अर्थात शनिवारी 1 फेब्रुवारी रोजी श्री गणेश जयंतीच्या दिवशी संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी संप्रदाय भजन मंडळ, पाजपंढरी यांच्या दिंडीचा तसेच भजन सेवेचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर ह. भ. प. श्री. विजय नित्सुरे, आंजर्ले यांचे श्रींच्या जन्मोत्सवाचे सुश्राव्य किर्तनाचा कार्यक्रम झाला त्याला डॉ. श्रीपाद बिवलकर तसेच श्रीकर बापट यांनी साथ दिली.