मानाच्या शिखरी काठ्यांची जेजुरी गडावर देवभेट रंगली

महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडाला माघ पौर्णिमा यात्रेनिमित्त मानाच्या शिखरी काठ्या भेटल्या. होलम, होळकर, खैरे व प्रासादिक शिखर काठ्यांच्या देवभेटीचा सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी हजारो भाविकांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ असा जयघोष करीत भंडाऱ्याची मुक्त उधळण केली.

माघ पौर्णिमेच्या निमित्ताने पारंपरिक पद्धतीने आज सकाळी संगमनेरच्या होलम राजाची शिखरकाठी चिंचेच्या बागेतून वाजतगाजत खंडोबा गडावर आणण्यात आली. सकाळी 11 वाजता होलम राजाच्या शिखर काठीचा देवभेट सोहळा झाला. तर दुपारी 1 वाजता सुपे येथील खैरे व जेजुरीमधील अहिल्यादेवी होळकर यांची मानाची काठी खंडोबा गडाला भेटवण्यात आली. यावेळी शिखर काठीचे मानकरी तुकाराम काटे, दिलीप गुंजाळ, मंगेश म्हेत्रे, काशिनाथ होलम, गणेश काटे, आमदार अमोल खताळ, शहाजी खैरे, आबा खैरे, शरद खैरे, भगवान खैरे, देवीदास भुजबळ व होळकर काठीचे मानकरी बबनराव बयास, मिलिंद माने, बाळू नातू, देवीदास बयास, विश्वस्त अभिजित देवकाते, विश्वस्त अॅड. विश्वास पानसे, मंगेश घोणे, अॅड. पांडुरंग थोरवे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी देवसंस्थानचे व्यवस्थापक आशिष बाठे, अधिकारी सतीश घाडगे, गणेश डिखळे, बाळासाहेब खोमणे, सागर गोडसे उपस्थित होते.