दत्तक दिलेल्या मुलाला दत्तक कुटुंबात वारसा हक्काने मिळालेल्या संपत्तीवर त्याचे जैविक (मूळ) नातेवाईक हक्क सांगू शकत नाहीत. मद्रास हायकोर्टाने यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय दिला आहे. यासाठी हायकोर्टाने हिंदू दत्तक कायदा 1956 चा हवाला दिला.
इरोड जिह्यातील मोदाकुरिची येथील व्ही. शक्तिवेल यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेला परवानगी देताना हे आदेश देण्यात आले. 5 जून रोजी झालेल्या सुनावणीत न्या. जी. के. इलानथिरायन यांनी स्पष्ट केले की, जर एखाद्या व्यक्तीला दत्तक देण्यात आले असेल तर दत्तक देण्याच्या तारखेपासूनच जैविक पालकांचा त्याच्याशी काही संबंध उरत नाही. त्यामुळे दत्तक दिलेल्या मुलाचे जैविक नातेवाईक कायदेशीररीत्या वारसा प्रमाणपत्राची मागणी करू शकत नाहीत. याप्रकरणी व्ही. शक्तिवेल यांनी रिट याचिका दाखल केली होती. यामध्ये त्यांनी चुलत भावाला (ज्याला दत्तक देण्यात आले होते) मिळालेल्या संपत्तीवर दावा केला होता.
दत्तक गेलेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे जैविक नातेवाईक वारसा प्रमाणपत्र मागू शकत नाहीत, असे हायकोर्टाने स्पष्ट केले. याचिकाकर्ता व्ही. शक्तीवेलच्या वकिलाने केलेल्या युक्तिवादाशी न्या. जी. के. इलानथिरायन यांनी सहमती दर्शवली. न्यायालयाने त्यांची याचिका स्वीकारून संबंधित महसूल विभागीय अधिकाऱयांना मागील आदेश रद्द करण्यास सांगितले.
काय आहे प्रकरण
व्ही शक्तिवेल यांच्या चुलत भावाचा 2020 साली मृत्यू झाला. त्याचे नाव कोट्रावेल सेतूपती असे होते. तसेच त्याला दत्तक घेणाऱया शक्तिवेलच्या काका-काकीचाही मृत्यू झाला. हे प्रकरण कोर्टात नेत शक्तिवेलने कोट्रावेलच्या संपत्तीवर दावा केला. त्याच वेळी कोट्रावेलच्या जैविक नातेवाईकांनीही संपत्ती आपल्याला मिळावी म्हणून दावा केला. या प्रकरणाची सुनावणी मद्रास हायकोर्टात झाली.