पत्रिका छापल्या, मंडप सजला अन् नवरी म्हणाली, ‘माझं दुसऱ्यावर प्रेम आहे’, वडिलांनी गोळ्या घालत शरिराची चाळण केली

मध्य प्रदेशमधील ग्वालियर येथे हत्येची एक थरारक घटना घडली आहे. लग्न ठरलेल्या मुलीची वडिलांनी गोळ्या घालून हत्या केली. तनू असे मृत मुलीचे नाव असून हत्येपूर्वी तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात तिने कुटुंबावर जबरदस्तीने लग्न लावून देत असल्याचा आणि कुटुंबीयांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप केला. एवढेच नाही तर माझे दुसऱ्या मुलावर प्रेम असल्याचेही तिने सांगितले होते.

एनडीटीव्ही इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, हत्येची ही घटना मंगळवारी रात्री एका मंदिराच्या परिसरात घडली. मुलीने व्हिडीओ शेअर करत बदनामी केली आणि यामुळे समाजात आपली छी-थू झाली या रागातून महेश गुर्जर यांनी गावठी कट्ट्यातून तिच्यावर गोळ्या झाडल्या. तनूच्या चुलत भावानेही तिच्यावर गोळ्या झाडत तिच्या शरिराची चाळण केली. यात तनूचा जागीच मृत्यू झाला.

मला विकीशी लग्न करायचे आहे. आधी माझ्या कुटुंबानेही यास परवानगी दिली होती. पण नंतर त्यांनी नकार दिला. ते मला रोज मारतात, जिवे मारण्याची धमकी देतात. माझ्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास त्याला माझे कुटुंबीय जबाबदार असतील, असे तनूने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओत म्हटले होते. तनूचे प्रेम असणाऱ्या तरुणाचे नाव विकी मवई असून तो उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे राहतो. सहा महिन्यांपासून दोघे रिलेशनशिपमध्ये होते.

दरम्यान, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक धर्मवीर सिंह यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने तनूच्या घरी जाऊ कुटुंबीयांची समजूत काढली होती. प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी पंचायत बोलावण्यात आले. यावेळी तनूने घरी राहण्यास नकार दिला आणि वन स्टॉप सेंटरला जाण्याचा निर्णय घेतला. याचाच राग आल्याने तनूच्या वडिलांनी गावठी पिस्तूलातून तनूवर गोळीबार केला. त्यानंतर तनूचा चुलत भाऊ राहुल यानेही तिच्यावर गोळीबार केला.

वडिलांना अटक

तनूची हत्या केल्यानंतर आरोपी महेश आणि राहुलने पोलिसांवरही बंदुक ताणली. पोलिसांनी महेश यांच्या मुसक्या आवळल्या, मात्र राहुल पिस्तूल घेऊन फरार झाला. त्याचा शोध सुरू आहे. तनूचे लग्न 18 जानेवारी होणार होते. मात्र तत्पूर्वीच तिची हत्या करण्यात आली.