लग्नसोहळा अचानक दुःखात बदलला, घोड्यावर बसलेला नवरदेव अचानक बेशुद्ध पडला आणि नंतर…

मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यामध्ये लग्नसोहळ्याचा आनंद अचानक दुःखात बदलल्याची एक घटना घडली आहे. घोड्यावर बसून वरातीचा आनंद घेत असलेल्या नवरदेवाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी घडली असून शनिवारी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये प्रदीप नावाचा नवरदेव पारंपारिक पोशाखात घोड्यावर बसून मंडपाच्या दिशेने निघत होता. अचानक तो पुढच्या दिशेला झुकतो आणि बेशुद्ध होताना दिसत आहे. नातेवाईक त्याला सावरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत, मात्र तोपर्यंत तो खाली पडतो. वरातीत आलेल्या लोकांना नेमके काय झाले ते समजलेच नाही. मात्र त्यांनी प्रदीपला उठविण्याचा प्रयत्न केला. तो काहीच हालचाल करत नव्हता. त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आल. डॉक्टरांनी त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगत मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूने सगळ्यांचा धक्का बसला. कोणालाच विश्वास होईनासा झाला. त्याच्या मृत्यूच्या बातमीने नववधूलाही धक्का बसला आणि बेशुद्ध झाली.

लग्न समारंभात अचानक मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना नाही. आठवड्यापूर्वीच विदिशा जिल्ह्यात एका संगीत कार्यक्रमात नाचताना तरुणीचा मृत्यू झाला होता.