मध्य प्रदेशातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता भिकाऱ्यांना भिक देणे महागात पडू शकते. इंदूर प्रशासनाने भिकाऱ्यांना भिक देणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई करणार असल्याचा फर्मानच काढला आहे. याबाबत 1 जानेवारीपासून नियम लागू होणार असून याबाबत पोलीस शहरात जागरुकता मोहीमही राबवत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारीनंतर जर कोणी भिकाऱ्यांना भिक देताना आढळल्यास त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. भिकाऱ्यांना भिक देऊन पापाचे भागीदार होऊ नका असे, आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी इंदूरच्या नागरिकांना केले आहे. ते म्हणाले की, प्रशासनाने मागच्या काही महिन्यांमध्ये भिक मागायला भाग पाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाकडून देशातील 10 शहरांमध्ये भिकाऱ्यांची सुटका करण्यासाठी हा पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे. या शहरांच्या यादीत इंदूरचा समावेश आहे. त्यामुळे आता इंदूर जिल्हा प्रशासन या आदेशावर अंमलबजावणी करण्यासाठी कंबर कसत आहे.
दरम्यान, मागच्या काही दिवसांमध्ये इंदूर पोलिसांनी शहर भिकारीमुक्त करण्यासाठी एक पथक तयार करत 14 भिकाऱ्यांना अटक केली. या अभियानातंर्गत एक धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांकडून पकडण्यात आलेल्या भिकाऱ्यांपैकी राजवाड्याच्या शनि मंदिराजवळ भिक मागणाऱ्या महिलेकडे 75 हजार रुपये सापडले. पोलिसांच्या माहितीनुसार हे केवळ दहा ते बारा दिवसांत पैसे जमवले होते.