कृषिमंत्र्यांच्याच राज्यात शेतकऱ्यांवर अन्याय! जिल्हाधिकारी कार्यालयात न्यायासाठी शेतकऱ्याचे लोटांगण

मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात एका शेतकऱ्याची जमीन भूमाफियांनी बळकावल्याने त्याला न्यायासाठी लोटांगण घालण्याची वेळ आली आहे. वारंवार याबाबत तक्रार करुनही त्यावर कोणीच दखल घेतली नाही. अखेर या शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयातच लोंटागण घालत आपली कैफीयत मांडली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान हे मध्य प्रदेशचे असून त्यांच्याच राज्यात शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. मध्य प्रदेशातील मन हेलावणारा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून लक्ष वेधत आहे.

शंकरलाल असे या वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे. भूमाफियांमुळे त्रस्त झालो आहे. चूक तहसीलदार करतात आणि भुर्दंड शेतकऱ्यांना पडतो. चूक त्यांनी केली आणि त्याचे परिणाम मला भोगावे लागत आहेत. त्यामुळे सरकार आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणाबाबत नाराज आहे. इथले अधिकारी भ्रष्ट आहेत. मी फार त्रासलो आहे आणि शेतकऱ्यांची येथे फसवणूक केली जात आहे, असा आरोप शेतकरी शंकरलाल यांनी केला.

याप्रकरणी जिल्हाधिकारी दिलीप यादव यांनी स्पष्टीकरण दिले आहे. जनसुनावणीमध्ये जी काही प्रकरणे येतात, त्यावर आम्ही तत्काळ तोडगा काढतो. मंगळवारी अनेक या जनसुनावणीमध्ये सहभागी झाले होते. येथे आलेल्या लोकांच्या समस्या जाणल्या आणि त्याचे निराकारणही केले. मागच्या वेळेच्या जनसुनावणीच्या प्रकरणांचाही आढावा घेण्यात आला, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तक्रारदार शेतकऱ्यानेच त्या वादग्रस्त जमीनीवर कब्जा केला आहे. शंकरलाल आणि त्याच्या कुटुंबाकडे ही जमीन आहे. भाडेकरारावर शेती कसणाऱ्यांनी विकलेली अर्धी जमिनी खरेदीदाराने ताब्यात घेतली नाही, असे स्थानीय प्रशासनाने स्पष्ट केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

स्थानिय प्रशासनाद्वारे उपलब्ध केलेल्या कागदपत्रांच्या आधारे तहसीलदाराकडून सादर केलेल्या अहवालानुसार, सुखाड गावामध्ये क्षेत्र क्रमांक 604मध्ये 2.5 हेक्टर आणि सर्व्हे क्रमांक 625 मध्ये 1.01 हेक्टर जमिनीचा समावेश आहे. ही जमीन शंकरलाल आणि त्यांचे कुटुंबीय फुलचंद यांचा मुलगा अनोखीलाल, भगवान भाई आणि रेशम भाई यासोबत घाटी येथील बाबा घासीराम, कारू लाल, रामलाल, प्रभु लाल, मांगी बाई आणि पार्वती बाई यांच्याजवळ आहे. या जमिनीचा अर्धा हिस्सा 31 डिसेंबर 2010च्या विक्री करारानुसार, मंदसौर निवासी नारायण राव यांचा मुलगा अश्विनला विकण्यात आला होता. सदर जमिनीच्या हस्तांतरणात 2010-11 मध्ये सीतामऊचे तत्कालीन तहसीलदाराकडून स्थानांतरण रजिस्टरमध्ये मान्यता दिली होती. विक्री केलेली जमीन कारू लाल, रामलाल, प्रभु लाल, मांगी बाई आणि पार्वती बाई यांच्या ताब्यात आहे. जे ती अश्विनला सोपविण्यास तयार नाहीत.