
विचार करा तुम्ही सकाळी उठून कामाला जायची तयारी करताय आणि तेवढ्यात एक सरकारी नोटीस येते. तुम्हाला 6 कोटी रुपयांचा कर भरायचा आहे, असे या नोटीसमध्ये लिहिलेले असेल तर तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. असाच प्रकार मध्य प्रदेशमधील दमोह येथे घडला आहे.
हातगाडीवर अंडी विकून दिवसाला 200-400 रुपये कमावणााऱ्या आणि कुटुंबाचे पालन पोषण करणाऱ्या व्यक्तीला जीएसटी विभागाने तब्बल 6 कोटी रुपयांची नोटीस पाठवली आहे. एवढेच नाही तर कधी ‘इंडिया गेट’ही न पाहिलेल्या या व्यक्तीच्या नावावर दिल्लीमध्ये कंपनी असून त्या कंपनीची वार्षिक उलाढाल 50 कोटी रुपयांची असल्याचेही म्हटले आहे. यामुळे संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे.
दमोह जिल्ह्यातील पथरिया तालुक्यात प्रिन्स सुमन नावाचा तरुण राहतो. त्याच्या वडिलांचे नाव श्रीधर सुमन आहे. 18 मार्च रोजी त्याला जीएसटी विभागाने पोस्टाने एक नोटीस धाडली होती. नोटीसमध्ये पॅनकार्ड नंबरची माहिती आणि त्याच्या कंपनीच्या वार्षिक उलाढालीचा उल्लेख करण्यात आला होता.
प्रिन्स एंटरप्राईझेस नावाची एक कंपनी 2022 मध्ये दिल्लीच्या वॉर्ड-33 मध्ये सुरू करण्यात आली होती. या कंपनीने 2022-23 ते 2023-2024 या आर्थिक वर्षांमध्ये चामडे, लाकूड आणि लोखंडाचा व्यापार करून तब्बल 50 कोटी रुपयांचा व्यवसाय केला, मात्र जीएसटी भरला नाही. त्यामुळे तुमच्याकडे 6 कोटी रुपये बाकी असून ते लवकरात लवकर भरावे, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले होते.
नोटीस आल्यानंतर प्रिन्सने आधी याची माहिती मित्रांना दिली आणि त्यानंतर वडिलांचा सल्ला घेतला. नंतर मित्रांसोबत वकील अभिलाष खरे यांच्याकडे गेला. वकिलांनी ही नोटीस खरी असल्याचे सांगितले. मात्र प्रिन्सने माध्यमांशी बोलताना आपण कधी दिल्लीचे तोंडही पाहिले नसल्याचे सांगितले.
काही वर्षांपूर्वी मी इंदूरमध्ये काम करत होतो. जवळपास एक वर्ष मी तिथे होतो. यादरम्यान मी माझे पॅनकार्ड आणि आधारकार्ड कोणालाही दिले नाही, असेही प्रिन्सने सांगितले. दरम्यान, नोटीस आल्यानंतर प्रिन्सने पोलीस ठाणे गाठले असून तक्रार दाखल केली आहे. एवढेच नाही तर आयकर विभागालाही पत्र लिहून सर्व माहिती दिली असून प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.