Champions Trophy 2025 – टीम इंडियाच्या विजयानंतर धुडगूस घालणं महागात पडलं, पोलिसांनी मुंडन करून गावभर फिरवलं

दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर झालेल्या अंतिम लढतीत हिंदुस्थानने न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव केला आणि चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले. तब्बल 12 वर्षानंतर हिंदुस्थानने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि देशभरात जल्लोष सुरू झाला. लोक रस्त्यावर उतरले, ढोल-ताशांचा गजरात लोक नाचू लागले आणि फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. काही ठिकाणी तरुणांनी धुडगूसही घातला. असाच प्रकार मध्य प्रदेशमधील देवास जिल्ह्यातही घडला. आता या प्रकरणी पोलिसांनी कडक कारवाई करत धुडगूस घालणाऱ्यांना ताब्यात घेत मुंडन केले आणि त्यांची परेड काढली.

रविवारी रात्री हिंदुस्थानी संघाने चॅम्पियन्स ट़्रॉफी जिंकली आणि त्यानंतर देवास जिल्ह्यातील तरुण रस्त्यावर उतरले. तरुण चुकीच्या पद्धतीने फटाक्यांची आतषबाजी करू लागले. यामुळे आजूबाजूच्या लोकांच्या जीवितास आणि इमारतींनाही धोका निर्माण झाला. यावेळी स्टेशन प्रभारी अजय सिंह गुर्जर यांनी घटनास्थळी पोहोचत तरुणांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी तरुणांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली. पोलिसांशी गैरवर्तन करत वाहनाचा पाठलाग केला आणि त्यावर दगडफेक केली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला.

त्यानंतर पोलिसांनी 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यापैकी दोघांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांचे जबरदस्ती मुंडन केले आणि त्यांची धिंड काढली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या स्थानिक आमदार गायत्रीराजे पवार यांनी पोलीस स्थानकात धाव घेतली आणि पोलीस अधीक्षक पुनीत गेहलोत यांची भेट घेतली.

हे तरुण हिंदुस्थानचा विजय साजरा करत होते. ते रेकॉर्डवरील गुन्हेगार नाहीत. त्यांचे मुंडन करून त्यांची अशी सार्वजनिकरित्या धिंड काढणे चुकीचे आहे, असे गायत्रीराजे पवार म्हणाल्या.  हा मुद्दा आपण विधीमंडळात उपस्थित करणार आहे, असे त्या म्हणाल्या.