मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एका व्यक्तीला राज्यातील भीक प्रतिबंधक कायद्या (Madhya Pradesh Begging Prevention Act.) अंतर्गत ट्रॅफिक सिग्नलजवळ भीक मागितल्याबद्दल अटक करण्यात आली.
इंग्रजी वृत्तसंकेत स्थळ इंडिया टुडेनं यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. झोन 2 चे पोलीस उपायुक्त संजय अग्रवाल दिलेल्या माहिती नुसार सिग्नलवर भीक मागणाऱ्या भिकाऱ्याविरुद्ध एका व्यक्तीने एमपी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारदारानं म्हटलं आहे की, जेव्हा त्याने भीक मागणाऱ्या माणसाला विचारले की, तू दुसरे काही काम करतो का तेव्हा त्याने नकार देत भीक मागूनच जगतो असं सांगितलं.
पोलिसांनी मध्य प्रदेश भीक प्रतिबंधक कायद्याअंतर्गत भिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली.
अग्रवाल यांनी सांगितलं की, त्यांना अशा तक्रारी आल्या आहेत की ‘जे भिकारी असल्यासारखे दिसत नाहीत’ ते देखील शहरातील प्रमुख वाहतूक सिग्नलवर भीक मागताना दिसतात. अशा प्रकरणांचा तपास करून पोलीस कारवाई करत आहेत.