![mahakumbh (1)](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/mahakumbh-1-2-696x447.jpg)
महाकुंभला जाण्यासाठी देशभरात भाविक रेल्वे स्थानकांवर गर्दी करत आहेत. मात्र, प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्यासाठी जागा मिळत नसल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे संतप्त नागरिक ट्रेनची तोडफोड करत आहेत. अशीच घटना नुकतीच बिहारच्या मधुबनी स्थानकावर घडली. ट्रेन आधीच प्रवाशांनी खचाखच भरून आली असताना स्थानकावर उभे असलेल्या शेकडो नागरिकांची ट्रेनमध्ये चढण्यासाठी चढाओढ लागली. मात्र जागा मिळत नसल्याने संतापलेल्या प्रवाशांनी ट्रेनवर तुफान दगडफेक केली आणि एसी डब्यांच्या खिडक्या फोडल्या आहेत. त्यामुळे ट्रेनमधील प्रवासी प्रचंड भयभीत झाले होते. या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर आता रेल्वे मंत्रालय अॅक्शन मोडवर आली आहे.
काही दिवसांपूर्वी बिहारमधील मधुबनी रेल्वे स्थानकावरील गोंधळाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. महाकुंभमेळ्याला जाणारे मोठ्या संख्येने प्रवासी ट्रेनमध्ये चढू न शकल्यामुळे संतप्त झाले होते. संतप्त प्रवाशांनी स्वतंत्र सेनानी सुपर फास्ट एक्सप्रेसच्या खिडक्या फोडल्या. घटनेच्या व्हिडिओमध्ये प्रवासी ट्रेनवर दगडफेक करताना आणि एसी कोचच्या काचा फोडताना दिसत आहेत. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, रेल्वे मंत्रालयाने तोडफोडीच्या या प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याच्या आरोपाखाली या लोकांविरुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. व्हिडिओच्या आधारे चेहरे ओळखून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आरोपींची ओळख पटल्यानंतर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या आधारे गुन्हेगारांची ओळख पटवली जात आहे. सीसीटीव्ही तपासणीच्या आधारे रेल्वे तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.