
विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी येत्या 27 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. भारतीय जनता पक्षाने त्या निवडणुकीसाठी संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते माधव भांडारी यांच्यावर मात्र पुन्हा अन्याय झाला आहे.
पाच जागांपैकी तीन जागा भाजपच्या कोट्यातील आहेत, तर मिंधे गट आणि अजित पवार गटाकडे प्रत्येकी एक जागा आहे. भाजपने उमेदवारी दिलेले संदीप जोशी हे नागपूर महानगरपालिकेचे माजी महापौर, संजय केनेकर भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने केचे यांच्या जागेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पीए सुमित वानखेडे यांना तिकीट दिले होते. त्यामुळे केचे यांचे विधान परिषदेवर पुनर्वसन करण्यात आल्याचे म्हटले जाते. विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी (मिंधे गट), राजेश विटेकर (अजित पवार गट), प्रवीण दटके (भाजप), गोपीचंद पडळकर (भाजप) आणि रमेश कराड (भाजप) हे विधानसभेवर निवडून गेले. त्यामुळे या पाच जागा रिक्त झाल्या आहेत.
विधान परिषदेतील संख्याबळ
- भाजप 19
- शिवसेना 7
- अजित पवार गट 7
- काँग्रेस 7
- मिंधे गट 6
- राष्ट्रवादी काँग्रेस 3
- अपक्ष 3
- एकूण सदस्य 52
भाजप सत्तेत आल्यापासून भांडारी उपेक्षित
विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी भाजपकडून दिल्लीला यादी पाठवण्यात आली होती. त्यात माधव भांडारी आणि अमर राजूरकर यांचा समावेश होता असे सांगितले जात होते, परंतु माधव भांडारी यांना पुन्हा एकदा भाजपने विधान परिषदेसाठी डावलले आहे. भांडारी हे संघ आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. 2014 पासून राज्यात भाजप सत्तेवर असल्यापासून भांडारी यांना एकही महत्त्वाचे पद दिले गेलेले नाही. विधान परिषद असो वा राज्यसभेची उमेदवारी असो, प्रत्येक वेळी भांडारी यांच्या नावाची चर्चा झाली, परंतु प्रत्यक्षात ते उमेदवारीपासून वंचितच राहिले.