
हॉस्टेल लाईफ म्हंटल की विद्यार्थ्यांना चिंता असते ती तिथल्या जेवणाची. हॉस्टेलच्या जेवणात उंदीर, पाल आढळल्याच्या अनेक बातम्या आपण पाहिल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांनी अनेकदा मोर्चे काढले तर काहींमध्ये भांडणे झाली. अशातच आता कर्नाटकातील कॉलेजमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. येथे एका चपातीवरून विद्यार्थ्यांमध्ये राडा झाला. यामध्ये एक विद्यार्थी जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कर्नाटकातील कलाबुर्गी केंद्रीय विद्यापाठीत ही घटना घडली. येथे जेवणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाली. कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये मशीनमध्ये बनवलेल्या चपात्या विद्यार्थ्यांना दिल्या जातात. मात्र बिहार वरून कर्नाटकात शिकायल्या आलेल्या एका विद्यार्थ्याने मेसमध्ये हाताने बनवलेल्या चपात्यांची मागणी केली. यावेळी मेसमधील काही मुलांनी याला विरोध केला. यामुळे एका चपातीवरून दोन गटात वाद निर्माण झाला. हा वाद इतका वाढला की त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. यामध्ये एक विद्यार्थी जखमी झाला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळतात कॉलेज प्रशासनाने तत्काळ कारवाई करत पोलिसात तक्रार दाखल केली. दरम्यान पोलिसांनी कॉलेजमध्ये जाऊन तेथील परिस्थिती आटोक्यात आणली. तसेच जखमी विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले.