कविता गोबाडे यांना ममता पुरस्कार, रश्मी ठाकरे यांच्या हस्ते आज होणार सन्मान

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जाणीव न्यास या फाऊंडेशनतर्फे माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे ममता पुरस्कार सोहळ्याचे आयोजन उद्या, शुक्रवारी दुपारी 2 वाजता दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात करण्यात आले आहे. यंदाचा ममता पुरस्कार कविता गोबाडे यांना जाहीर झाला आहे. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. धनादेश, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

दोन दशके भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून लातूर येथील समाजसेविका कविता गोबाडे भटके विमुक्त वस्त्यांवर आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अहोरात्र कार्यरत आहेत. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले असून सहा महिन्यांचे प्रथमोपचार प्रशिक्षण त्यांनी घेतले आहे. अंधश्रद्धा, अज्ञान, अस्वच्छता यामुळे भटके विमुक्तांच्या वस्त्यांमध्ये आरोग्याच्या अनेक समस्या होत्या. आरोग्य शिबिरे, लसीकरण, कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती, शासकीय योजनांबद्दल माहिती देणे अशा विविध माध्यमांतून त्यांनी भटक्या विमुक्त लोकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळवून दिल्या. गोपाळ समाजासाठी केलेले कार्य, कोरोनाकाळात जनजागृती, बालमृत्यू आणि मातामृत्यू कमी करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. आरोग्य सुविधांसाठी दुर्गम भागात लागणाऱ्या मनुष्यबळाचा अभाव लक्षात घेऊन त्यांनी वस्तीमधील महिलांना प्रशिक्षण देऊन आरोग्य दूत म्हणून उभे केले आहे.

महानगर टेलिफोन निगम कर्मचाऱ्यांनी स्थापन केलेल्या कामगार संघद्वारे संचालित ‘जाणीव ट्रस्ट’तर्फे दरवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे ‘ममता पुरस्कार सोहळा’ आयोजित केला जातो. शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली जाणीव ट्रस्टची स्थापना झाली.