केरळचे ज्येष्ठ नेते एम.ए बेबी यांची माकपच्या सरचिटणीसपदी निवड

केरळमधील माकपचे ज्येष्ठ नेते एम.ए बेबी यांची माकपच्या सरचिटणीसपदी निवड झाली आहे. सिताराम येचूरी यांचे निधन झाल्यानंतर पक्षाचे हे पद रिक्त होते. 71 वर्षांचे असलेले बेबी हे माकपच्या पोलिटब्युरोचे सदस्य आहेत. यापूर्वी 1986 ते 1998 ते राज्यसभेत खासदार होते. तर 2006 ते 2011 दरम्यान ते केरळमध्ये शिक्षणमंत्री होते.

तमिळनाडूच्या मदुराईमध्ये माकपची 24 वी सभा भरली होती. त्यावेळी बेबी यांची निवड झाली. केरळचे माजी मुख्यमंत्री नंबुद्रीपाद यांच्यानंतर बेबी माकपचे केरळमधून झालेले दुसरे सरचिटणीस आहेत.

केरळच्या कोल्लम जिल्ह्यात जन्मलेल्या बेबी यांनी विद्यार्थीदशेत असताना राजकारणात प्रवेश घेतला होता. पक्षात त्यांनी विद्यार्थी सेना, डेमेक्रोटिक युथ फेडरेशन इंडिया संघटनेचेही अध्यक्षपद भुषवले आहे. राष्ट्रीय कार्यकारणीत 85 नव्या सदस्यांची निवड झाली आहे. त्यापैकी 18 जणांची ही पोलिटब्युरोची समिती असणार आहे.