लखनौच्या मोहनलालगंजमध्ये सध्या एका लग्नाची गोष्ट चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. लग्नात मद्यपानावरुन वाद पेटला तो हाणामारीपर्यंत पोहोचला आहे. एवढेच नाही तर महिलांनी एकमेंकींच्या झिंज्या उपटल्या आहेत. अखेर संतापलेल्या नवरदेवानेही स्टेजवरुन उडी घेत भांडणात सहभागी झाला. जाणून घेऊया नेमके काय प्रकरण आहे ते.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहनलालगंज येथील शेतकरी सुखलाल यांची मुलगी आरती हिचा विवाह उन्नाव जिल्ह्यातील रहिवासी कमलेशसोबत होता. लग्नाची मिरवणूक आल्यानंतर तेथील काही पाहुणे मद्यधुंद अवस्थेत होते. त्यांनी नाश्त्यावरुन आक्षेपार्ह बोलले. त्यावरुन त्यांच्यात बाचाबाची झाली. मात्र, प्रकरण वाढत असल्याचे पाहून ज्येष्ठांनी दोन्ही पक्षांना कसेबसे शांत केले. मात्र सातफेरे सुरू झाल्यावर दोन्ही बाजूंमध्ये पुन्हा वाद सुरू झाला. काही वेळातच या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. स्टेजवरच मारामारी झाली.
नववधूच्या बाजूच्या काही लोकांनी वरातींमध्ये जोरदार भांडण होत असल्याचे पाहिल्यानंतर त्यांनीही त्यात उडी घेतली. काही वेळातच लग्नमंडप रणांगण बनला. दरम्यान, संतापलेल्या नवरदेवाने गळ्यातील फुलमाळा तोडून फेकून दिली. त्यानेही स्टेजवरून उडी मारून मारामारी सुरू केली. यादरम्यान नववधू स्टेजवरून खाली पडली. पुरुषांबरोबरच महिलांनीही भांडणात उडी घेतली. एकमेंकींच्या झिंज्या उपटल्या. कार्यक्रमात खुर्च्या फेकल्या जाऊ लागल्या. दोन्ही पक्षांची समजूत काढण्याचे प्रयत्न झाले मात्र एकही पक्ष झुकायला तयार नाही, असा आरोप होत आहे. दरम्यान, नवरदेवाच्या मोठ्या भावाच्या गाडीची काचही फोडण्यात आली.
लग्नात आलेले पाहुणे दारूच्या नशेत होते, त्यामुळे हाणामारी झाल्याचा दावा केला जात आहे. याप्रकरणी दक्षिण विभागाचे डीसीपी केशव कुमार यांनी सांगितले की, घटनेचा तपास सुरू आहे. दोन्ही पक्षांना समोरासमोर बोलावण्यात आले आहे. पण ते तडजोड करायला तयार नाहीत. सध्या जो कोणी तक्रार देईल त्यानुसार कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले आहे.