
बहिणीसह तिच्या प्रियकराची भावाने निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना बिहारच्या मोतिहारी येथे घडली आहे. केसरिया पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या त्रिलोकवा गावात पोलिसांना एक तरुण आणि तरुणीचा मृतदेह आढळला होता. विकास पासवान आणि प्रिया कुमारी अशी मृतांची नावे असून या दोघांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अमन कुमार याला अटक केली आहे. अमन मृत प्रिया कुमारी हिचा भाऊ असून त्याने वेबसिरीजमधील व्हिलन हथौडा त्यागीप्रमाणे दोघांचीही हत्या केली.
डीएसपी सत्येंद्र कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, केसरिया पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या त्रिलोकवा गावात अमन कुमार याने घरातील लोखंडी हतोड्याने स्वत:ची बहीण आणि तिच्या प्रियकाची हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रेमी युगुलाचे मृतदेह ताब्यात घेतले. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनाला पाठवून पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपी अमन कुमार याला अटक केली.
विकास कुमार पासवान हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर हत्येसह अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. त्याचे आणि प्रिया कुमारी हिचे प्रेमसंबंध होते. दोन महिन्यांपूर्वी विकास तुरुंगातून बाहेर आला होता. प्रेयसीचा फोन आल्यानंतर तो तिला भेटायला घरी गेला होता. दोघेही एकाच रुममध्ये होते. याचवेळी अमनने त्यांना नको त्या अवस्थेमध्ये पाहिले आणि त्याचा पारा चढला.
समाजाच्या भीतीने अमनने दोघांचीही हत्या केली. आधी त्याने दोघांना खोलीची कडी बाहेरून लावत बंद केले, त्यानंतर घरातील लोखंडी हतोडा घेऊन आला आणि दोघांवर एका मागोमाग वार केले. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
रात्री दहाच्या सुमारास मुलगा जेवण करत होता आणि त्याला प्रियाचा फोन आला. कुणाचा फोन आलाय, एवढा रात्री कुठे चालला, जाऊ नको म्हटले तरी त्याने ऐकले नाही आणि तो गेला. त्यानंतर मी झोपले. रात्री झोपमोड झाल्यानंतर पाहिले तर मुलगा घरात नव्हता. याचवेळी विकासचा फोन आला आणि मला खोलीत कोंडल्याचे सांगितले. त्यानंतर त्याचा फोन स्विच ऑफ झाला. आता त्यांची हत्या झाल्याचे वृत्त कळते, असे विकासच्या आईने हुंदके आवरत सांगितले.