प्रशासकीय कारण देत पुढे ढकललेल्या म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5311 घरांसाठी संगणकीय सोडत कधी निघणार, याकडे अर्जदारांचे डोळे लागले आहेत. मात्र अर्जदारांना आता आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. कोकण मंडळाची सोडत जानेवारीअखेरपर्यंत काढण्यात येईल, असे संकेत राज्याचे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांनी नुकतेच दिले आहेत.
म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या 5311 सदनिकांकरिता 15 सप्टेंबरपासून ऑनलाईन अर्ज नोंदणीस सुरुवात झाली होती, तर 13 डिसेंबरला ऑनलाईन संगणकीय सोडत काढण्यात येणार होती. या सोडतीसाठी 24 हजार 303 अर्ज प्राप्त झाले आहेत, मात्र प्रशासकीय कारण देत ही सोडत पुढे ढकलण्यात आली. सोडतीची नवीन तारीख संबंधित अर्जदारांना मोबाईलवर एसएमएसद्वारे कळविण्यात येणार असल्याचे मंडळातर्फे कळविण्यात आले होते. महिना उलटून गेला तरी एसएमएस न आल्याने सोडतीची नवीन तारीख कधी जाहीर होणार याकडे अर्जदारांचे लक्ष लागले आहे.