
म्हाडाच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडातर्फे राज्यभरातील सुमारे 7500 घरांसाठी याच महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून मुंबईसह कोकण, पुणे, छत्रपती संभाजीनगर येथे ही घरे आहेत.
म्हाडाच्या प्रत्येक मंडळाची वर्षातून किमान एक तरी लॉटरी काढण्याचा मानस अलीकडेच म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार आचारसंहिता संपताच म्हाडामध्ये लॉटरीची लगबग सुरू झाली आहे.
मुंबईतील घरांसाठी 22 जुलैला जाहिरात?
मुंबईतील 1900 घरांसाठी साधारण 22 जुलैपर्यंत जाहिरात प्रसिद्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अर्ज भरण्यासाठी इच्छुकांना महिनाभर मुदत देण्यात येईल आणि गणेशोत्सवापूर्वी संगणकीय सोडत काढली जाईल, असे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तत्पूर्वी याच आठवडाभरात पुणे, कोकण, संभाजीनगर येथील 5600 घरांच्या विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध होईल, असेही अधिकाऱ्याने सांगितले.
कुठे किती घरे
मुंबई 1900
कोकण 1600
पुणे 2500
छत्रपती संभाजीनगर 1500