दर्श अमावास्येचा मुहूर्त साधत श्री शनिमहाराजांच्या दर्शनासाठी आज तीर्थक्षेत्र शनिशिंगणापुरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली. शनिवार आणि रविवार अशी दोन दिवस दर्श अमावास्या आहे. सायंकाळपर्यंत साडेतीन लाखांहून अधिक भाविकांनी शनिदर्शनाचा लाभ घेतला. यावेळी श्री शनिदेवाच्या जयजयकाराने मंदिर परिसर दुमदुमून गेला. अमावास्येचा आज मुख्य दिवस असल्याने श्री शनिदेवांच्या मूर्तीला पंचामृत, दूध, दही, तूप आणि गंगास्नानाने अभिषेक घालण्यात आला. तसेच मूर्तीला सोन्याचा मुकुट, हिरेजडित हार घालून पूजाअर्चा करण्यात आली. दुपारच्या महाआरतीनंतर यात्रेस प्रारंभ करण्यात आला. तसेच पहाटेची मुख्य आरती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते करण्यात आली, तर माध्यान्ह आरती झिम्बाब्वे येथील शनिभक्त जय शहा, उद्योगपती सौरभ बथारा यांच्या हस्ते करण्यात आली.