
आषाढी एकादशमीनिमित्त महाराष्ट्रासह देश, विदेशातूनही विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लोकं येतात. महाराष्ट्राशेजारील राज्य कर्नाटकातील भाविकही मोठ्या संख्येने पंढरपुरात दाखल होतात. ‘कानडा राजा पंढरीचा’ म्हणत कर्नाटकातील भाविक विठ्ठलाचरणी नतमस्तक होतात. याच पंढरपूरच्या वारीत भरकटलेला एक पाळीव कुत्रा तब्बल 250 किलोमीटर पायपीट करत मालकापर्यंत पोहोचला आहे. मालकासह गावकऱ्यांनी त्याचे हार घालत स्वागत केले आणि मिरवणूकही काढली. याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून ‘जणू विठुरायानेच त्याला मार्ग दाखवला’, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.
‘महाराज’ असे या पाळीव कुत्र्याचे नाव आहे. आषाढी एकादशीनिमित्त मालकासोबत तो पंढरपूरला गेला होता. मात्र वारीमध्ये महाराज हरवला आणि तब्बल 250 किलोमीटर पायपीट करत महाराष्ट्र-कर्नाटक सीमावरील निपाणीजवळील यमगरणी गावी पोहोचला. यानंतर त्याची हार घालून गावातून मिरवणूक काढण्यात आली. एवढेच नाही तर त्याच्यासाठी गावकऱ्यांना मेजवानीही देण्यात आली.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील निपाणीजवळील यमगरणी गावातील कमलेश कुंभार यांचे कुटुंब गेल्या 30 वर्षांपासून पंढरपूरची वारी करतात. दरवर्षी ते पंढरपूरला पायी जातात. या कुटुंबासोबत ‘महाराज’ हा पाळीव कुत्राही पंढरपूरला जातो. कोल्हापुरातील नानीबाई चिखलीहून पंढरपूरला जात असताना महाराज कुंभार कुटुंबापासून विभक्त झाला.
कुंभार कुटुंबाने महाराजचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र वारकऱ्यांच्या गर्दीमध्ये तो दिसेनासा झाला. त्यामुळे हे कुटुंब रिकाम्या हाताने घरी परतले. बऱ्याच काळापासून हा कुत्रा कुंभार कुटुंबासोबत राहत असल्याने गावकऱ्यांचीही त्याच्यावर माया बसली होती. मात्र तो हरवल्याने कुंभार कुटुंबियांसह गावकरीही दु:खी झाले. गावकऱ्यांनी सोशल मीडियावर ‘महाराज’ची माहिती पोस्ट करत त्याचा शोध सुरू ठेवला.
आठवडाभर ‘महाराज’चा शोध सुरू होता. कुटुंबियांसह गावकऱ्यांनीही कुत्रा सापडण्याची आशा सोडली होती. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे दोन दिवसांपूर्वी ‘महाराज’ घरी परतला. कुत्रा परत येत असल्याचे दिसताच कुंभार कुटुंबियांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यानंतर गावकऱ्यांनी त्याच्या गळ्यात पुष्पहार घालून त्याची मिरवणूक काढली आणि याचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले. ‘महाराज’ला भजन-किर्तनाचीही आवड असून एकदा तो ज्योतिबाच्या दर्शनासाठीही आमच्यासोबत आला होता, असे कुंभार यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.
…तर तो घरी परतला नसता
दरम्यान, पाळीव प्राणी प्रवास करत असलेल्या मार्गावर मलमूत्र सोडतात आणि त्याच मार्गाने परत येतात. महाराज हा पंढरपूरला कारने गेला असता तर तो परत येऊ शकला नसता. मात्र पायी प्रवास करत असताना त्याने त्या मार्गावर मलमूत्र सोडले आणि त्याच्या वासानेच तो पुन्हा घरी परतला असे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सॅम लुड्रिक यांनी सांगितले.