वारीत हरवलेले श्वान सुखरूप घरी, पंढरपूर ते कर्नाटक 250 किमीचा प्रवास

कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यातील यमगरनी गावात एक आश्चर्यकारक घटना घडली. महाराष्ट्रातील पंढरपूरच्या यात्रेत हरवलेले श्वान चक्क 250 किलोमीटरचा प्रवास एकटय़ाने करत बेळगावातील आपल्या मालकाच्या घरी परतलं. वारीत रस्ता चुकलेले श्वान परत येणे हे गावकऱ्यांसाठी चमत्काराहून कमी नव्हते. समस्त गावकऱयांनी काळ्या श्वानाला हार घालून त्याची गावातून मिरवणूक काढली. त्याच्या सन्मानार्थ गावजेवण घातले. ‘महाराज’ असे या श्वानाचे नाव आहे.

 जूनच्या शेवटच्या आठवडय़ात कमलेश कुंभार पंढरपूर वारीसाठी निघाले होते. त्यांच्याबरोबर त्यांचा श्वानही होता. पुंभार दरवर्षी आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जातात. यावेळी त्यांनी आपल्या सोबत महाराजला घेतले होते. मात्र विठ्ठल मंदिराच्या दर्शनानंतर महाराज बेपत्ता झाला. पुंभार 14 जुलैला निपाणीला परतले. त्यानंतर दुसऱया दिवशी महाराज त्यांच्या दारात उभा होता. जणू काही घडलेच नाही, असे शेपूट हलवत होता.