शिवरायांचा अवमान करणारा कोरटकर फरार! लुक आऊट नोटीस जारी, पत्नीकडून पोलिसांनी जप्त केला पासपोर्ट

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करून इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरविरोधात पोलिसांनी ‘लुक आऊट’ नोटीस बजावली आहे. त्याचा पासपोर्ट पत्नीकडून पोलिसांनी आज ताब्यात घेतला. दरम्यान, कोरटकर देशाबाहेर पळून गेल्याच्या अफवा उठल्या होत्या, मात्र तो राज्यातच लपला असून पोलिसांच्या हाती लागू शकलेला नाही.

कोरटकरला ‘लुक आऊट’ नोटीस बजावण्यात आल्यानंतर ब्युरो ऑफ इमिग्रेशनकडून कोरटकरने कुठे कुठे प्रवास केला याचाही शोध घेतला जात आहे. कोरटकरचे दुबईतील पह्टो आज अचानक समोर आले होते. त्यामुळे तो परदेशात पसार झाल्याचे बोलले जात होते. मात्र हे पह्टो जुने असल्याचे नंतर समोर आले. कोरटकर राज्यातच असून तो चंद्रपुरात लपल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

नागपूरमधील कोरटकर यांने इंद्रजीत सावंत यांना पह्न करून अर्वाच्य भाषेत संभाषण केले. शिवाय छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महारांजांबद्दल त्याने आक्षेपार्ह वक्तव्यही केले होते. याबाबत इंद्रजीत सावंत यांनी केलेल्या तक्रारीनंतर कोरटकरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र कोरटकर 25 फेब्रुवारीपासून फरार असून अद्याप त्याचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. यातच कोरटकर याचा अंतरिम जामीन मुंबई उच्च न्यायालयाने 19 मार्चला फेटाळला आहे. त्यामुळे त्याला अटक होणार हे निश्चित झाले आहे, मात्र तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. दरम्यान, फरार कोरटकर फरार होण्याच्या शक्यतेमुळे त्याचा पासपोर्ट जप्त करा, अशी मागणी इंद्रजीत सावंत यांनी केली आहे.

विरोधकांकडून टीका

कोरटकरला पकडण्यात अपयश आल्यामुळे नागपूरच्या पोलीस आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करा व सुरक्षा मिळवा, अशी फडणवीस सरकारची योजना असून महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला सरकारच पाठिशी घालत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.