लंडन विमानतळावर गोंधळ, हजारो प्रवासी रस्त्यावर आणि पार्किंगमध्ये अडकले; नेमकं काय घडलं?

ब्रिटनमधील दुसरं सर्वात मोठं विमानतळ असलेल्या गॅटविकच्या दक्षिण टर्मिनलचा एक मोठा भाग शुक्रवारी सुरक्षा कारणांमुळे रिकामा करण्यात आला. ज्यामुळे हजारो प्रवासी रस्त्यावर आणि पार्किंगच्या ठिकाणी अडकून पडले.

विमानतळ प्रशासनाने या घटनेची पुष्टी केली असून त्यांनी सांगितलं की, विमानतळ अद्यापही सुरक्षा कारणांमुळे बंद ठेवण्यात आलं आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा विमानतळ सुरु करण्यात येईल. प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आम्ही या समस्येचे त्वरीत निराकरण करण्याच्या दिशेने काम करत आहोत.” असे त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये म्हटलं आहे.

या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये प्रवासी विमानतळापासून दूर जाताना आणि बाहेर शेकडो लोकांचा जमाव जमलेला दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमुळे विमानतळाकडे जाणारी बस सेवा विस्कळीत झाली असून गॅटविक विमानतळ स्थानकावरील रेल्वे सेवाही पुढील सूचना मिळेपर्यंत थांबवण्यात आली आहे.

दरम्यान, नेमकं येथे काय घडलं आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. प्रवाशांना प्रवास करण्यापूर्वी त्यांच्या मार्गाची स्थिती तपासण्याचा सल्ला येथील प्रशासनाने दिला आहे.