पाणीपट्टी वाढ, चुकीच्या निविदा; जागरूक मंच, सर्वपक्षीय नेत्यांची लोणावळा नगरपालिकेवर धडक

प्रस्तावित करवाढ, पाणीपट्टीतील 30 टक्के दरवाढ आणि घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत चुकीच्या पद्धतीने निविदा प्रक्रिया राबविल्याच्या निषेधार्थ लोणावळा जागरूक नागरिक मंच, सर्व पक्ष आणि संघटनांनी नगरपालिकेवर गुरुवारी मोर्चा काढला. यावेळी आमदार सुनील शेळके हेदेखील उपस्थित राहिले. उपस्थितांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करीत ठिय्या आंदोलन केले.

निविदा प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबविण्यात आल्याचा आरोप करत ही प्रक्रिया तत्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. जी कामे नगरपालिका आजवर पाच कोटींमध्ये करत होती. त्या कामासाठी अकरा कोटी रुपये एकाच ठेकेदाराच्या घशात घालण्याचा घाट का घातला जात आहे? असा सवाल नागरिक विचारत आहेत. ही नागरिकांच्या कररूपी पैशांची लूट असून, संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली. याचाच एक भाग म्हणून गुरुवारी स्थानिक नागरिक, पक्षांच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिकेवर मोर्चा नेला. पालिकेच्या आवारातील महापुरुषांना अभिवादन करून पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जात असतानाच मुख्य प्रवेशद्वाराजवळ नागरिकांना अडविण्यात आले. त्यामुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. तसेच या सर्व पाश्र्वभूमीवर मुख्याधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून चौकशी करावी. अडवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

आंदोलनाला आमदार सुनील शेळके, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संघटक मच्छिंद्र खराडे, सूर्यकांत वाघमारे, निखिल कविश्वर, यशवंत पायगुडे, प्रमोद गायकवाड, नासिर शेख, विलास बडेकर, कमलशिल म्हस्के, शादान चौधरी, संजय भोईर, किरण गायकवाड, बाळासाहेब जाधव, देवीदास कडू, बाबा शेट्टी, अनिश घनात्रा, भरत चिकणे, जीवन गायकवाड यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.